scorecardresearch

विदर्भातील शंभर वर्षे जुन्या ग्रंथालयांची दुरवस्था

वाचनाने माणूस घडतो आणि ही जडणघडण ग्रंथालयांमधून होते. अशाप्रकारे वाचन संस्कृतीला हातभार लावणारी विदर्भातील शंभर वर्षे जुनी १८ ग्रंथालयांची अवस्था सध्या अतिशय वाईट आहे.

राम भाकरे
नागपूर : वाचनाने माणूस घडतो आणि ही जडणघडण ग्रंथालयांमधून होते. अशाप्रकारे वाचन संस्कृतीला हातभार लावणारी विदर्भातील शंभर वर्षे जुनी १८ ग्रंथालयांची अवस्था सध्या अतिशय वाईट आहे. जागतिक ग्रंथ दिवस शनिवारी साजरा होतो आहे, त्या पार्श्वभूमीवर हे चित्र क्लेशदायक ठरते.
अनेक ग्रंथालयातील प्राचीन ग्रंथांना वाळवी लागलेली आहे, तर काही ग्रंथालयाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. शासकीय अनुदान मिळणे कमी झाल्याने व उत्पन्नाचे फारसे साधन नसल्यामुळे इमारती दुरुस्त करण्यासाठी निधी नाही, असे या ग्रंथालयांचे चित्र आहे.
शंभर वर्षे जुन्या ग्रंथालयांमध्ये नागपूरमधील महालातील राष्ट्रीय ग्रंथालय त्यापैकीच एक. त्याची स्थापना १८६१ ची. लोकमान्य टिळकांसह अनेक थोर पुरुषांनी याला भेटी दिल्या. पण आज ग्रंथालयाची इमारत पडायला आली. वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे लोकमान्य ग्रंथालयाला स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी कर्वे यांनी भेटी दिल्या असून त्याची तीच अवस्था आहे. अचलपूर, अमरावती, परतवाडा, खामगाव, वाशीम, अकोला, पुसद, यवतमाळ, वर्धा येथील ग्रंथालयांना मिळणारे अनुदान दोन वर्षांपासून बंद आहे.
शंभर वर्षे पूर्ण झालेल्या ग्रंथालयांना ५ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे यापूर्वी शासनाने जाहीर केले होते. पण तेही काही निवडक ग्रंथालयांना देण्यात आले.
गेल्या पाच-दहा वर्षांत विदर्भातील ग्रंथालयाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्यामुळे येणाऱ्या काळात ही शतकी पार केलेली ग्रंथालये बंद होतात का, अशी भीती कर्मचारी व ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये निर्माण झाली आहे.


विदर्भातील शंभरी पार केलेली ग्रंथालये

• राष्ट्रीय वाचनालय महाल, नागपूर स्थापना- १८६१
• राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय – १८६९
• लोकमान्य वाचनालय, आर्वी – १८६५
• सत्यनारायण बजाज सार्वजनिक ग्रंथालय, वर्धा – १८७०
• महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय, हिंगणघाट – १८९५
• सार्वजनिक वाचनालय, परतवाडा – १८६९
• अमरावती नगर वाचनालय – १८६७
• सार्वजनिक वाचनालय, अचलपूर शहर – १८९५
• नगर वाचनालय, वणी – १८७४
• नागर वाचनालय, यवतमाळ – १८८७
• देशभक्त शंकरराव सर नाईक सार्वजनिक वाचनालय – १८८६
• नगर वाचनालय अकोट – १८८५
• दस्तुर रतनजी ग्रंथालय खामगाव – १८८९
• सार्वजनिक वाचनालय भंडारा – १८९१
• राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय, वाशीम – १८९९
• लोकमान्य टिळक वाचनालय, ब्रम्हपुरी – १९०३
• बाबूजी देशमुख वाचनालय, अकोला झ्र् १८६०
‘‘पश्चिम महाराष्ट्रातील ग्रंथालयांना प्रोत्साहन देताना विदर्भातील ग्रंथालयाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. जुन्या ग्रंथालयांना टिकवणे आवश्यक आहे. शतकोत्तर अनुदान एक वर्ष देण्यात आले नंतर बंद करण्यात आले. ’’– रवींद्र पांडे सहसचिव, ग्रंथालय भारती
‘‘शंभर वर्षांपेक्षा अधिक जुन्या ग्रंथालयांच्या इमारत जीर्ण झाल्या आहेत. अनुदान पुरेसे मिळत नाही, त्यामुळे देखभाल दुरुस्तीवर मर्यादा आल्या आहेत. अनेक ग्रंथालयांना स्वमालकीच्या इमारती नाहीत.’’ – पद्मश्री तांबेकर अध्यक्ष, राष्ट्रीय ग्रंथालय, महाल

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Poor condition hundred year old libraries vidarbha reading libraries reading culture world book day amy

ताज्या बातम्या