विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, येत्या दोन दिवसात मोठय़ा थेंबांचा पाऊस किंवा गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हे वातावरण येत्या १५ दिवसापर्यंत असेच कायम राहू शकते, असेही हवामान अभ्यासकांनी सांगितल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांसह फळबाग शेतकरीही धास्तावले आहेत. सूर्याचे उत्तरायण सुरू असल्याने सूर्य जसजसा जवळ येत आहे, तसतसे तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. तापमान वाढले की, हवेतील थंड वाऱ्याशी त्यांचा संयोग होऊन ढग तयार होतात. हिवाळ्याच्या अखेरीस आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत अशी स्थिती कायम असते. त्यामुळे या कालावधीत वादळी पाऊस ठरलेला आहे. थंडीमुळे ढग खाली आणि ढगांखाली बर्फ तयार होतो. जमिनीपासून हे अंतर कमी असल्याने बर्फ पडण्याची शक्यता अधिक असते. तापमान जेथे जेथे वाढते तेथे तेथे वातावरणातील गार वारे संपर्कात आल्याने ढग तयार होऊन मोठय़ा थेंबांचा पाऊस पडतो. दरवर्षी या कालावधीत अशीच स्थिती निर्माण होते. त्यामुळे येत्या १५ दिवस हे वातावरण कायम राहील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.