अकोला : भडकावू भाषणाची चित्रफित व विचार‎ समाज माध्यमातून प्रसारित होऊ नये,‎ यासाठी आक्षेपार्ह व जनप्रक्षोभक‎  ‘पोस्ट’ प्रसारित करण्यास बंदी‎ घालण्यात आली आहे. नुपूर शर्मा‎ प्रकरणाची कोणतीही अशी ‘पोस्ट’ प्रसारित केल्यास भारतीय दंड‎ संहितेचे १८६० चे कलम ५०५,१५३ अ,‎ ११६ अन्वये कारवाई करण्यात येणार‎ आहे, तसे आदेश जिल्हा‎ अपर दंडाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी निर्गमित केले आहेत. जिल्ह्याचे वातावरण‎ सलोख्याचे राहावे, यासाठी हे आदेश‎ जारी करण्यात आले आहेत.‎

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देश-विदेशात त्याचे पडसाद उमटले. यामुळे धार्मिक तेढ निर्माण झाला. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने झाली. उदयपूर येथे सर्वसामान्य व्यक्तीची गळा चिरून केलेली हत्या‎ व अमरावती येथील घटनेचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित करण्यात‎ आले आहेत. नुपूर शर्मा विरोधात‎ विविध लोकांचे भडकाऊ भाषणाचे‎ चित्रफितसुद्धा समाज माध्यमावर‎ प्रसारित करण्यात आले आणि नुपूर‎ शर्माचे समर्थनार्थ पण काही घोषणा,‎ घोषवाक्य प्रसारित‎ करण्यात आले आहेत. या घटनेमुळे‎ दोन्ही समाजातील युवकांमध्ये एक‎ प्रकारे विध्वंसक विचार या चित्रफिती व‎ भाषणामुळे बळावत चालले आहे.‎ त्यामुळे समाजात दुहीचे‎ वातावरण निर्माण होत आहे.‎ संवेदनशील जिल्हा म्हणून अकोला जिल्ह्यात‎ कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,‎ या दृष्टीने नुपूर शर्मा संबंधाने समाज माध्यमावर कोणत्याही प्रकारच्या पोस्ट,‎ भडकावू भाषणे, आक्षेपार्ह बाबी‎ प्रसारित करणे भारतीय दंड संहिता‎ १८६० कलम ५०५,१५३ अ, ११६ नुसार‎ दंडनीय अपराध आहे. या बाबी प्रसारित करणाऱ्याविरुद्ध कारवाई‎ करण्यात येणार आहे, असे आदेश‎ अपर जिल्हादंडाधिकारी प्रा. संजय‎ खडसे यांनी जारी केले आहेत.