नागपूर : आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाची सुविधा भारतीय टपाल कार्यालयांत उपलब्ध असली, तरी या सेवांच्या वेळेबाबत स्थानिक पातळीवर स्पष्टता नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही कार्यालयांत सेवांच्या वेळेत बदल केले जात असून त्याची पूर्वसूचना नागरिकांना दिली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आधारचे काम करण्यासाठी नागरिकांना वारंवार टपाल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (यूआयडीएआय) आधार सेवांमध्ये नाव किंवा अन्य तपशीलांतील दुरुस्ती, छायाचित्र बदल, पत्ता अद्ययावत करणे, मोबाइल क्रमांक जोडणे तसेच बायोमेट्रिक अद्ययावतीकरण आदी सुविधांचा समावेश आहे. या सुविधा नागरिकांना टपाल कार्यालयांतूनही मिळतात. मात्र, आधार सेवांच्या उपलब्धतेच्या वेळांबाबत स्थानिक पातळीवर एकसमानता नसल्याचे दिसून येत आहे.

वेळ वेगवेगळ्या

काही टपाल कार्यालयांत आधारसंबंधी कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत केले जाते, तर काही ठिकाणी सकाळी १० ते दुपारी ३ अशी वेळ असल्याचे नागरिकांना सांगण्यात येते. काही कार्यालयांत मात्र केवळ सकाळी ९ ते ११ या दोन तासांच्या कालावधीतच आधार अद्ययावतीकरणाची कामे केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांना सेवा नेमकी कोणत्या वेळेत मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
नागपूर शहरातील विवेकानंदनगर टपाल कार्यालयातील प्रकारामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे. प्रारंभी या कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आधार अद्ययावतीकरण केले जात असल्याचे सांगण्यात आले. दुपारी २ नंतर आलेल्या नागरिकांना दुसऱ्या दिवशी वेळेत येण्यास सांगितले जात होते. त्यानुसार शितल मुळे यांनी दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता कार्यालय गाठले असता संबंधित कर्मचारी सुटीवर असल्याने आधार अद्ययावतीकरणाचे काम बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आधार अद्ययावतीकरणाची सेवा सकाळी ९ ते ११ या वेळेतच केली जाईल, अशी सूचना कार्यालयात लावण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आधी सांगण्यात आलेल्या वेळेनुसार कार्यालयात पोहोचलेल्या नागरिकांना पुन्हा माघारी जावे लागले. वेळेबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाया जात असल्याच्या तक्रारी आहेत.

कार्यालयाचे स्थलांतर

दरम्यान, अनेक टपाल कार्यालये भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू असल्याने वाहनतळासह अन्य सुविधांचे प्रश्नही निर्माण होतात. कार्यालयाचे स्थलांतर झाल्यास त्याची माहिती नागरिकांना वेळेत मिळणे आवश्यक आहे. विवेकानंदनगर येथील कार्यालयाच्या स्थलांतराची पुरेशी माहिती नसल्याने काही नागरिकांना नवीन पत्ता शोधण्यासाठीही भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.

आधार ही नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची सेवा असल्याने टपाल कार्यालयांतील तिच्या वेळेबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यालयात आधार सेवा कोणत्या वेळेत उपलब्ध आहे, याची माहिती ठळकपणे प्रसिद्ध करावी. तसेच सेवांच्या वेळेत बदल झाल्यास त्याची पूर्वसूचना नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणी अभिषेक गिनगुले यांनी केली आहे.

‘वेळेत बदल योग्य नाही’

सेवेच्या वेळेत वारंवार बदल करणे योग्य नाही. आम्ही सार्वजनिक सेवा देत आहोत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आधार अद्ययावतीकरणाची सुविधा घरपोच देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकरणाची संबंधित टपाल कार्यालयाकडून माहिती घेण्यात येईल. – हमीलपूर शरत कुमार, वरिष्ठ अधीक्षक, डाकघर