बुलढाणा : देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तिपासून तब्बल साठ वर्षे सत्तेत राहणाऱ्या काँग्रेसने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. मात्र यामुळे गरिबी तर हटली नाहीच, उलट गरीब आणखी गरीब झाला, अशी टीका केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केली.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ चिखली येथे सभा पार पडली. यावेळी गडकरी यांनी इतर नेत्यांप्रमाणे विरोधकांवर जहाल टीका करण्याचे कटाक्षाने टाळले. काँग्रेसच्या दीर्घ राजवट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या काळातील विकासकामांची त्यांनी संयमी भाषेत चिकित्सक तुलना केली. तसेच भाषणाचा रोख विकासकामावरच ठेवला.

हेही वाचा…“भाजपमुळे भ्रमनिरास झाल्यानेच मतदानाची टक्केवारी घसरली,” ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका; म्हणाले, ‘‘संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच…”

काँग्रेसने आपल्या राजवटीत विविध योजनांची घोषणा केली, ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. तसेच आधी २० कलमी, नंतर ५ कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. मात्र, गरिबी तर हटली नाहीच, गरीबच बाजूला हटला, तो आणखी गरीब झाला. याचे कारण त्यांनी भरमसाठ घोषणा दिल्या, योजना आखल्या.

मात्र, त्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी केली नाही. यामुळे त्या व्यर्थ ठरल्या. उलट पंतप्रधान मोदी यांनी योजना व अंमलबजावणीची सांगड घातली. यामुळे त्यांच्या काळात ६० वर्षांच्या तुलनेत जास्त विकास झाला, असे गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा…शरद पवारांनी आधी शेतकरी विधवांची माफी मागावी, गृहमंत्री अमित शाह यांची टीका

भारताला विश्वगुरु, आर्थिक महासत्ता करण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आपल्या विकासकामांची माहिती देत पुढील पाच वर्षांत आपण खामगाव-जालना, अकोट-खंडवा रेल्वेमार्ग, नदीजोड प्रकल्प यांच्या अंमलबजावणीला चालना देणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार धृपदराव सावळे, विजयराज शिंदे यांच्यासह महायुतीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.