वीज वितरण कंपन्या म्हटले की तोटा, थकबाकी आणि आर्थिक संकट हेच चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र, गेल्या काही वर्षांतील आर्थिक आकडेवारीत मोठा बदल झाल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वार्षिक अहवालातून समोर आले आहे. सतत तोट्यात असलेल्या देशातील वीज वितरण कंपन्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकत्रितपणे तब्बल २,७०१ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. अवघ्या एका वर्षात आर्थिक चित्र कसे बदलले? वितरणातील तोटा किती कमी झाला? या सुधारणेचा ग्राहकांना फायदा होणार का?
कंपन्या तोट्यातून नफ्यात कशा आल्या?
देशातील वीज वितरण कंपन्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षात कर भरल्यानंतर एकत्रित २५ हजार ५५३ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मात्र, २०२४-२५ मध्ये याच कंपन्यांनी २,७०१ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. म्हणजेच, एका वर्षात त्यांच्या आर्थिक कामगिरीत मोठी सुधारणा झाली. वीज खरेदी आणि पुरवठ्यासाठी होणारा खर्च तसेच वीजविक्रीतून मिळणारा महसूल यांतील अंतर कमी होणे, हे या बदलामागील महत्त्वाचे चित्र आहे.
वीज वितरणातील तोटा किती घटला?
वीज वितरणातील तांत्रिक आणि व्यावसायिक तोटा कमी होणे हा या सुधारणेतील महत्त्वाचा घटक आहे. वीजवाहिन्यांमधील तांत्रिक नुकसान, वीजचोरी, बिलांमधील त्रुटी आणि वीजबिलांची पूर्ण वसुली न होणे अशा कारणांमुळे हा तोटा वाढत असल्याचे ऊर्जा मंत्रालयाने यापूर्वीही नमूद केले आहे. २०२०-२१ मध्ये हा तोटा २१.९१ टक्के होता. २०२४-२५ मध्ये तो १५.०४ टक्क्यांवर आला. म्हणजेच, या कालावधीत तोट्याचे प्रमाण ६.८७ टक्के-बिंदूंनी कमी झाले.
वीज खरेदी आणि विक्रीतील तफावतही घटली का?
होय. वीज खरेदी व पुरवठ्यासाठी होणारा खर्च आणि वीजविक्रीतून मिळणारा महसूल यांतील फरकही कमी झाला आहे. २०२०-२१ मध्ये हा फरक प्रति युनिट ६९ पैसे होता. २०२४-२५ मध्ये तो अवघ्या सहा पैशांवर आला. त्यामुळे वितरण कंपन्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत झाल्याचे अहवालातील आकडेवारीतून दिसते.
नफा झाला म्हणजे ग्राहकांना दिलासा मिळाला का?
तसे थेट म्हणता येणार नाही. कंपन्या नफ्यात आल्या म्हणजे वीजबिलांचा भार कमी झाला, ग्राहकांच्या तक्रारी सुटल्या किंवा अखंडित वीजपुरवठा सुरू झाला, असे नाही. आर्थिक सुधारणेचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी वीजपुरवठ्याची गुणवत्ता, तक्रारींचे निराकरण आणि वितरण व्यवस्थेतील सुधारणा यांनाही महत्त्व आहे.
‘सरकारी कंपन्याही नफा कमवू शकतात’
“वीज कंपन्यांचे खासगीकरण केल्यासच नफा होतो, असा काही राजकारण्यांचा समज आहे. मात्र, महाराष्ट्रातील तिन्ही सरकारी वीज कंपन्यांसह देशातील वीज वितरण कंपन्यांनी नफा नोंदवून हा समज चुकीचा ठरवला आहे. खासगीकरणामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे वीज वितरण क्षेत्र सरकारी कंपन्यांकडेच राहायला हवे.”- मोहन शर्मा, अध्यक्ष, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज
