गोंदिया : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातात अनेक संशयास्पद बाबी असल्यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
अजित पवारांचे जाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यासाठी दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा सखोल तपास विविध यंत्रणांद्वारे होत आहे. राज्य सरकारसुद्धा तपास करत आहेत. परंतु यामागे अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या अपघाताची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे.
अचानक एवढी मोठी दुर्घटना कशी होऊ शकते, याची ‘सीबीआय’द्वारे चौकशी करण्यात यावी आणि ही घटना महाराष्ट्रात घडल्यामुळे महाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशीची मागणी करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्र्यांना आम्ही दिले. सध्या स्वायत्त संस्था चौकशी करत असल्याने ‘ब्लॅक बॉक्स’संदर्भात मला अधिक माहिती नाही. मात्र, तो ‘डॅमेज’ झाल्याची प्राथमिक माहिती आहे, असे पटेल यांनी सांगितले.
अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवार यांना पूर्व विदर्भातील एका नेत्याचा फोन आला होता, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावरही पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. मी दिल्लीत होतो तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाऱ्यासंदर्भात मी त्यांना फोन केला होता. दादांनी याबाबत लवकरच व्यवस्था करतो, असे सांगितले होते. मी पक्षाचा एक जबाबदार नेता असून संयमाने बोलेल. माझ्याजवळ पुरावे असेल तेव्हाच बोलेल, असे पटेल म्हणाले.
वैमानिक ‘सुसाईड बॉम्बर’?
अकोला : अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी अत्यंत संथगतीने सुरू आहे. विमान कंपनीचा मालक रोहित सिंग याच्यावर असलेला वरदहस्त व राजकीय ‘गुलाबी’ संबंध गंभीर आहेत. आमदार रोहित पवार यांनी मांडलेले मुद्दे योग्यच असून त्याची तत्काळ दखल शासनाने घेतली पाहिजे. त्यांच्या मनातील शंकाच आमच्या मनातील आहेत.
पायलट ‘सुसाईड बॉम्बर’ होता का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सीबीआय चौकशीच्या मागणीचे दिलेले निवेदन गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. या प्रकरणामुळे मनात शंकेचे काहूर असल्याचेही आमदार मिटकरी यांनी म्हटले आहे.

