अकोला : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की निवडणूक आयोगाला नागरिकत्व ठरवता येत नाही. आयोगाला तो अधिकार कुठेच दिलेला नाही. नागरिकत्वाच्या नावाखाली निवडणूक आयोगाने लाखो मते मतदार यादीतून काढली. अधिकार नसतांना मते वगळल्याने राज्यघटनेप्रमाणे त्या राज्यांमधील निवडणुका निष्पक्ष आहेत का? असा गंभीर प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. चारही राज्यातील निवडणुका रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल कराव्या, असा सल्ला देखील त्यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुखांना दिला.
निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
अकोला येथे आज माध्यमांशी बोलतांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करीत जोरदार टीका केली. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने एडीआर विरूद्ध निवडणूक आयोगाच्या प्रकरणामध्ये परिच्छेद १७१ मध्ये म्हटले आहे की, नागरिकत्व कायदा, १९५५ अंतर्गत नागरिकत्वाची निश्चिती करणे हे केवळ गृह मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात येते.
नागरिकत्वाचा अधिकार न्यायालयाने स्पष्ट केला
एकट्या पश्चिम बंगालमध्ये ९० लाखांहून अधिक मतदार नागरिकत्वाच्या आधारावर मतदार यादीतून वगळण्यात आले. परिच्छेद १८६ (एच) नुसार आयोगाच्या मते नागरिक नसल्याच्या कारणास्तव ज्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांची प्रकरणे आयोग चार आठवड्यांच्या आत गृह मंत्रालयाकडे पाठवेल. याचा अर्थ असा की, निवडणूक आयोगाने काही व्यक्तींना गैर-नागरिक म्हणून घोषित केले आणि त्यांची नावे मतदार यादीतून वगळली. नागरिकत्व निश्चित करण्याचे अधिकार गृह मंत्रालयाकडे आहेत, भारतीय निवडणूक आयोगाकडे नाहीत, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.
विरोधकांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घ्यावी
तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, डीएमके, डावे यांनी निवडणुकीच्या निकालांना आव्हान द्यावे आणि अनुक्रमे पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू व केरळमधील निवडणुका रद्द करण्याची मागणी करणाऱ्या नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल कराव्यात, असा सल्ला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
सत्ताधारी भाजप फोडाफोडी करण्यासाठीच बसले आहेत
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपवरही जोरदार निशाणा साधला. सत्ताधारी भाजप पक्ष फोडाफोडीचे राजकारण करण्यासाठीच बसले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तृणमूलचे ६० काय तर सर्वच आमदार फोडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असा टोला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
