अकोला : ‘सरकारने अकोल्यात मोफत जलतरण तलाव खुले केले आहेत. जनतेने त्याचा लाभ घ्यावा व आगामी निवडणुकांमध्ये मतदानरुपी पुरस्कार सरकारला द्यावे,’ अशी उपहासात्मक टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
हेही वाचा >>> अश्लील हावभावांवर रोष, नागपुरात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल होणार




अकोला शहरातील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. अकोला शहरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या भावसामुळे सर्वत्र जलमय परिसर झाला. सखल भागामध्ये पाणी साचले आहे. शहराच्या विविध भागातील रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचे छायाचित्र ट्विट करीत ॲड. आंबेडकरांनी सरकारवर टीका केली. त्यामध्ये ते म्हणाले, ‘अकोल्यात जनतेसाठी अनेक ऑलिम्पिक जलतरण तलाव उपलब्ध झाले आहेत. काल रात्री शहरात झालेल्या पावसानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप सरकारने अकोल्यातील जनतेसाठी असंख्य ऑलिम्पिक स्पर्धेत वापरात येणाऱ्या आकाराचे मोफत जलतरण तलाव खुले केले आहेत.’ सरकारने उपलब्ध करून दिलेल्या मोफत जलतरण तलावाचा अकोलेकरांनी अवश्य लाभ घ्यावा. आगामी निवडणुकीत मतदान रुपी पुरस्कार सरकारला द्यावे, असा टोला देखील त्यांनी लगावला.