बुलढाणा : ‘एपिस्टन फाईल’मध्ये भारतातील काही नेत्यांची नावे असल्याची चर्चा आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव असावे, या शंकेला वाव आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहे. या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्ष आणि संघटनांसह येत्या २३ मार्चला नागपूर स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर धडक देणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली.
२३ मार्चला वंचित, काँग्रेसची संघ मुख्यालयावर धडक!
जगात खळबळ उडवून देणाऱ्या ‘एपिस्टन फाईल’मध्ये पंतप्रधान मोदींवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहे. २३ मार्चला वंचित बहुजन आघाडी संघ मुख्यालयावर धडक देणार आहे. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी, डावे पक्ष आणि विविध सामाजिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आंदोलनात आम्ही सरसंघचालकांना, ‘असा व्यक्ती संघाच्या चारित्र्याच्या व्याख्येत बसतो का? पंतप्रधान म्हणून चालतो का, असे थेट प्रश्न विचारणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
‘अमेरिका वा ट्रम्प बोले, भारत चाले!’
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या आंदोलनाची रूपरेषा ठरल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी २३ मार्चच्या आंदोलनात काँग्रेस सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय समविचारी विरोधी पक्ष, पुरोगामी संघटनादेखील आंदोलनात सहभागी होणार आहे. ‘एपिस्टन फाईल’मधील कथित सहभागमुळे अमेरिका आज भारताला आपल्या ईशाऱ्यावर नाचवत असल्याचे सांगत, अमेरिका आणि भारतात झालेला कृषी करार याचेच उदाहरण असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. यामुळे भारताचे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे. भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. ‘अमेरिका वा ट्रम्प बोले, भारत चाले’ असे चित्र निर्माण झाले आहे, असा आरोपही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
उत्तर देण्याची संघाची नैतिक जवाबदारी
अमेरिका आता भारतासाठी ईस्ट इंडिया कंपनी ठरण्याची स्थिती आहे. जगभरात भारताची नाचक्की होत आहे. ‘एपिस्टन फाईल’मध्ये पंतप्रधान मोदींबद्दल काही बदनामीकारक पुरावे असावे, अशी शंका वर्तवून, यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींना ‘ब्लॅकमेल’ करीत आहे. असा पंतप्रधान देशासाठी नुकसानकारक ठरणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. असा पंतप्रधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चालणार का? संघाच्या चारित्र्याच्या व्याख्येत असा पंतप्रधान बसतो का, असे प्रश्न आम्ही २३ मार्चच्या संघ मुख्यलयावरील आंदोलनातून विचारणार आहे. याचे उत्तर देण्याची संघाची नैतिक जवाबदारी असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवनात शनिवारी संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. यावेळी युवा नेते सुजात आंबेडकर, वंचितचे नेते धैर्यवान पुंडकर उपस्थित होते.
