चंद्रपूर : काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदाची सलग नऊ वर्षे धुरा सांभाळल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रकाश देवतळे सध्या त्यांच्या कथित ‘राष्ट्रीय’ निवडीमुळे चर्चेत आले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड झाल्याचा दावा करीत देवतळे यांचे चंद्रपुरात सत्कार सोहळे सुरू असले, तरी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नसल्याने त्यांच्या निवडीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
देवतळे यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवडीची घोषणा झाल्याचे सांगत स्थानिक पातळीवर त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मागील आठवड्यात चंद्रपूर महानगर भाजपच्या वतीने महानगर कार्यालयात देवतळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमात देवतळे यांचा ‘राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य’ म्हणून गौरव करण्यात आला. मात्र, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची निवड झाली असली, तरी कार्यकारिणी सदस्यांची निवड अद्याप झालेली नसल्याचे भाजपचे पूर्व विदर्भ संघटन प्रमुख उपेंद्र कोठेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे देवतळे यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याचा दावा नेमका कोणत्या आदेशानुसार आणि कोणत्या प्रक्रियेतून करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
“भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची निवड झालेली असली, तरी कार्यकारिणी सदस्यांची निवड अद्याप झालेली नाही. त्यामुळे प्रकाश देवतळे स्वतः राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याचे सांगून सत्कार सोहळे आयोजित करीत असले, तरी त्यांची या पदावर निवड झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.” – उपेंद्र कोठेकर, पूर्व विदर्भ संघटन प्रमुख, भाजप
राष्ट्रीय परिषद, कार्यकारिणी आणि कार्यसमितीत फरक
भाजपने राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची घोषणा केली असली, तरी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांची निवड अद्याप झालेली नसल्याचे सांगितले जाते. भाजपच्या संघटनात्मक रचनेत राष्ट्रीय परिषद, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय कार्यसमिती या स्वतंत्र पातळ्या आहेत. राष्ट्रीय परिषद सदस्यत्व आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यत्व या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत राष्ट्रीय परिषद सदस्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे या दोन्ही पदांमध्ये असलेला फरक लक्षात घेता देवतळे यांच्या ‘राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य’ म्हणून होत असलेल्या सत्कारामुळे पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे.
‘प्रदेश कार्यालयाचे पत्र मिळाले’ — देवतळे यांचा दावा
याबाबत प्रकाश देवतळे यांच्याशी संपर्क साधला असता, आपली निवड भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदीच झाल्याचा दावा त्यांनी केला. प्रदेश भाजप कार्यालयाकडून त्यासंदर्भातील पत्र प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या पत्राची प्रत उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता, आपण पुणे येथे होणाऱ्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत असल्याने सध्या पत्राची प्रत पाठवता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पत्राची प्रत उपलब्ध न झाल्याने त्यांच्या दाव्याभोवतीचा संभ्रम आणखी वाढला आहे.
एकीकडे स्थानिक भाजपकडून देवतळे यांचा ‘राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य’ म्हणून सत्कार केला जात आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची अधिकृत यादीच अद्याप जाहीर झालेली नसल्याचे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे देवतळे यांची ‘राष्ट्रीय’ निवड नेमकी कशी आणि कोणत्या आदेशानुसार झाली, याबाबत आता भाजपच्या अधिकृत भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
