नागपूर: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ अंतिम निकाल जाहीर केला आहे. याची लेखी परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आली होती, तर मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडल्या होत्या.

या दोन्ही टप्प्यांच्या आधारे आयोगाने एकूण ९५८ उमेदवारांची विविध केंद्रीय सेवांसाठी शिफारस केली आहे. यात नागपूरच्या केंद्रातील ऋतुजा गायकवाड १०६ रँक, रजत वाळके ५१४ वी रँक, भाग्यश्री नैकाले ६४७ रँक, प्रज्वल नासरे ६७७ रँक, चेतन ठाकरे ६६२ रँक, राजश्री देशमुख ७५४ रँक, प्रांजली मेश्राम ७६७ रँक, हेमकृष्ण पिसाडे ८४९ रँक, सुरेश बोरकर ९१२ रँक या उमदेवारांनी बाजी मारली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गृह मंत्रालयात अधिकारी म्हणून सेवा देत असलेल्या नागपूरच्या प्रांजली मेश्राम यांनी दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण करत सर्वांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

गुणवत्ता यादीत येऊनही कला शाखेत प्रवेश

प्रांजलीला दहावीच्या परीक्षेत गुणवत्तापूर्ण गुण मिळाले हाेते. आईवडिलांना वाटले मुलगी डाॅक्टर किंवा इंजिनीअर व्हावी पण तिने चक्क नकार दिला आणि अकरावीत कला शाखेत प्रवेश घेतला. का कुणास ठाऊक, तिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा रूबाब भारी वाटायचा आणि ताे तिला मिळवायचा हाेता. आज तिने अतिशय जिद्दीने बालपणीच्या ध्येयाला गवसणी घातली.

शुक्रवारी लागलेल्या युपीएससीच्या निकालात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नागपूरच्या प्रांजली प्रवीण मेश्राम यांनीही प्रशासकीय सेवेचा पल्ला गाठला आहे. प्रांजली यांचे वडील प्रवीण मेश्राम हे जिल्हा परिषद शाळेतून निवृत्त शिक्षक आहेत. बारावीमध्ये ९३ टक्के गुण मिळाले हाेते. त्यावेळी लोकसत्ताशी बाेलताना प्रांजली यांनी प्रशासकीय सेवेचे ध्येय बाेलून दाखविले हाेते. त्यानंतर २०२३ साली बी.ए. ची पदवी प्राप्त केली आणि आधीपासून सुरू केलेल्या युपीएससीच्या तयारीत स्वत:ला झाेकून दिले. काही दिवस नागपूरच्या एका संस्थेतून अभ्यास केल्यानंतर पुढे घरीच प्रयत्न सुरू केले. यादरम्यान त्यांनी दिल्ली येथे गृह मंत्रालयात सेवा सुरू केली. ऑनलाईन जे नाेट्स, प्रश्नसंच उपलब्ध हाेते, त्यातून अभ्यास केला. मुलाखतीसाठी यशस्वी झालेल्या वरिष्ठ उमेदवारांचे मार्गदर्शन घेतले आणि आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात युपीएससी क्रॅक केली.

प्रांजली यांना देशभरातून ७६७ वे रॅंक मिळाले आहे. या रॅंकनुसार जाे विभाग मिळेल ताे स्वीकारून पुन्हा प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. प्रांजली यांनी नोकरी करून आणि कुठलीही शिकवणी न लावता यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करता येते हे दाखवून दिलेले आहे. त्यांनी जणू एक नवीन आदर्श सर्व विद्यार्थ्यांसमोर उभा केलेला आहे. त्यांच्या या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल हे नक्की.