चंद्रपूर: महापौर व उपमहापौर निवडणुकीतील पराभवाचे खापर शिवसेना उध्दव ठाकरे, वंचित बहुजन आघाडी व एमआयएमवर फोडणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर या एकमेव नेत्या काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या आहे. ठाकरे सेना, वंचित व राष्ट्रवादी काँग्रेस(एसपी) या पक्षांशी निवडणूकपूर्व आघाडी न करता स्थानिक नेत्यांना अपमानास्पद वागणूक देणे, स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटूंबातील सदस्यापासून तर ९ निष्ठावंत नगरसेवकांची तिकीट कापून घोळ घालणे, संख्याबळ जुळविण्याऐवजी महापौर, गटनेते पदाचा बालहट्ट करणे आणि स्वपक्षीय नेत्यांवरच माध्यमात जाहीर टीका करण्यापासून तर समर्थकाच्या माध्यमातून स्वपक्षीय नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न या धानोरकरांकडून झालेल्या चुकाही काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत आहेत. महापौर पदाची जबाबदारी असतांना देखील दोन मते जुळविण्यात धानोरकरांना अपयश आले अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महापालिका निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासूनच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी समविचारी पक्षांना सोबत घेण्याऐवजी एकला चलो रे ची भूमिका घेत सर्वांनाच धुडकावून लावले. ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादीचे राजेंद्र वैद्य, वंचितचे स्नेहल रामटेके यांनी समविचारी पक्षांची आघाडी करून निवडणुक लढण्याचा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. मात्र खासदार धानोरकर यांनी सेना व राष्ट्रवादीचे स्थानिक पातळीवर संंघटन नाही अशी कारणे समोर करून सातत्याने अपमानीत केले. वंचितलाही अशाच पध्दतीने दूर ठेवण्याचे काम केले.

खासदार धानोरकर याच युतीस इच्छुक नसल्याचे बघून शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीने युती करून १७ प्रभागात ५० च्या वर उमेदवार निवडणुकीत उभे केले. तिकडे राष्ट्रवादीने २९ स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्यामुळे अनेक प्रभागात मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसला. धानोरकर यांनीच सलग पाच निवडणुका जिंकणारे स्वातंत्र्य सैनिक कुटूंबातील प्रशांत दानव, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, नंदू नागरकर अशा निवडणुक जिंकण्याची क्षमता असलेल्या नऊ निष्ठावंत नगरसेवकांच्या तिकीटा कापल्या आणि स्वत:च्या पीएच्या पत्नीपासून कार्यालयात काम करणाऱ्या तरूणाला, जिच्या सोबत कुणीच प्रचारात फिरू शकत नाही अशा उमेदवाराला तिकीटांची खैरात वाटली. वडेट्टीवार कन्येसाठी दिल्लीवारी करणारे हे सर्व नगरसेवक होते. त्यामुळेच वडेट्टीवार समर्थकांची तिकीट कापण्याचे काम धानोरकर यांनी केले. प्रचाराच्या रणधुमाळीतही मिळून प्रचार करण्याऐवजी स्वत:ला वेगळे ठेवले. निवडणुक निकालानंतर लगेच आम्हाला अपक्ष नगरसेवकांची गरज नाही असे वक्तव्य केले. त्यामुळे काँग्रेस विचारसरणीचे अपक्ष नगरसेवक पदोपदी अपमान नको म्हणून दूर झाले.

मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल देतांना काँग्रेस व जनविकास सेनेचे ३० नगरसेवक निवडून दिले.बहुमतासाठी ४ नगरसेवकांची जुळवाजुळव करण्याऐवजी महापौर व गटनेता या पदासाठी वडेट्टीवार यांच्यासोबत जाहीर भांडण ओढवून घेतले. निकालानंतर २३ नगरसेवकांचे प्रमाणपत्र स्वत:कडे ठेवून घेतले. समर्थक १३ नगरसेवकांना पर्यटनाला नेतांना वेगळा गट नोंदणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात प्रयत्न केले. नागपुरात विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात एका पाठाेपाठ एक जाहीर वक्तव्य केली. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक अक्षरश: दोन गटात विभागले गेले. नगरसेवकांच्या पळवा पळवी सोबतच समृध्दी मार्गावर नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न, शिवीगाळ असेही प्रकार घडले. महापौर व गटनेता हवाच या बालहट्टासाठी मुंबई पासून तर दिल्लीत हायकमांड पर्यंत वादावादी केली. या संपूर्ण घडामोडीत संख्याबळ जुळविण्याकडे दुर्लक्ष झाले.

दिल्लीतील हायकमांडने महापौर पद धानोरकर गटाकडे तर गटनेता व उपमहापौर पद वडेट्टीवार गटाकडे सोपविण्याचा निर्णय दिला. त्यानंतर महापौर निवडणुकीसाठी ३४ संख्याबळ जुळविणे धानोरकर यांची जबाबदारी होती. मात्र धानोरकर यांनी वंचित, एमआयएम आणि सेना ठाकरे यापैकी एकाशीही संपर्क साधला नाही. स्वपक्षीय बंडखोेर नगरसेवकांशी देखील संपर्क केला नाही. केंद्रीय नेतृत्वाने महापौर पद दिल्यानंतरही धानोरकर यांनी संख्याबळ जुळविण्याची जबाबदारी स्वत:कडे घेण्याऐवजी नागपुरचे सुनिल केदार यांच्याकडे सोपविली. केदार यांनी वडेट्टीवारांना सोबत घेत प्रयत्न केले. मात्र शेवटपर्यंत धानोरकर यांच्यासोबत जुळण्यासाठी एकही नगरसेवक समोर आला नाही. आम्ही वडेट्टीवार यांच्या सोबत राहू, आम्हाला असे म्हणून सर्वांनी वडेट्टीवार यांच्याशीच चर्चा केली. या संख्याबळ जुळविण्याच्या धावपळीत धानोरकर घरीच बसून होत्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी बाहेर पडून संख्याबळासाठी प्रयत्न केल्याचे कुठेच दिसले नाही.

आज धानोरकर सेना ठाकरे, वंचित, एमआयएम या तीन पक्षावर पराभवाचे खापर फोडत असल्या तरी मागील दिड दोन महिन्यांच्या कालावधीत स्वत: काय दिवे लावले याचेही एकदा आत्मपरिक्षण करावे आणि आजूबाजूचे सल्लागार वेळीच बदलावे अन्यथा लोकसभेत यापेक्षा वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रिया आता समाज माध्यमावर उमटल्या आहेत.