बुलढाणा : गुरुवारच्या दिवशी संतनगरी शेगावात भाविकांची मांदियाळी राहते. 'गण गणात बोते' च्या गजराने मंदिर परिसर निनादतो. पण १ जूनचा गुरुवार वेगळाच होता. शेगावात शेकडो विदर्भवाद्यांची मांदियाळी जमली. त्यांनी ' गण गण गणात बोते, आता विदर्भ होते' असा गजर केला. त्यामुळे हजारो भाविक काही क्षण स्तब्ध झाले. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. या अंतर्गत शेगाव येथील अग्रसेन भवनात विदर्भ आक्रोश मेळावा पार पडला. संध्याकाळपर्यंत चाललेल्या मेळाव्यात चटप यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यानंतर मोर्चा काढण्यात येऊन गजानन महाराज मंदिरात समारोप करण्यात आला. हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात ५७ टक्के पीक कर्जवाटप, दिरंगाई करणाऱ्या बँकांना’ नोटीस यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गजानन महाराजांना साकडे घालण्यात आले. आक्रोश मोर्चा थेट गजानन महाराज मंदिरात पोहोचून महाराजांच्या चरणी लीन झाला. आयोजनासाठी अॅड सुरेश वानखेडे, कैलास फाटे, तेजराव मुंडे, राम बारोटे, दामोदर शर्मा आदिनी परिश्रम घेतले.