नागपूर : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात शनिवार, सात फेब्रुवारीला ‘एसटीआर ०६’ या वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले. गुरुवार, पाच फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास या वाघिणीला पेंच व्याघ्रप्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून जेरबंद करण्यात आले. त्यानंतर थेट या वाघिणीची रवानगी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या दिशेने करण्यात आली. नंतर बोटीने प्रवास हरुन या वाघिणीला सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या कोयना अभयारण्यात शुक्रवारी रात्री आणले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. तिला पाणी आणि मटण खाण्यासाठी देण्यात आले. ते तीने योग्य पद्धतीने खाल्ले. शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास कोयना अभयारण्यातील गाभा जंगल क्षेत्रात तिला सुरक्षीत ठिकाणी सोडण्यात आले.

कोयना अभयारण्यात आधीचा असलेला ‘एसटीआर ०३’ या ‘बाजी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाच्या जोडीला नवीन आणलेली ही वाघीण ‘एसटीआर ०६’ ही नक्कीच कोयना वन्यजीव अभयारण्यात पर्यटन वाढीसाठी म्हावची घटना आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेने व अनेक दुर्मिळ प्रजातीने समृद्ध असा हा ११६५ चौरस किलोमीटरच्या परिसरात सातारा, सांगली, कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यात पसरलेला हा शासनाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ही मोहीम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उप संचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के, वनपरिक्षेत्र संग्राम गोडसे (फिरते पथक), अक्षय साळुंखे (कोयना),विजय बाटे (बामणोली), तुषार जानकर (पाटण), अक्षय करमळकर(कांदाट), मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सुनील भोईटे व वनपाल वनरक्षक ह्यांनी यशस्वी पार पाडले.

पेंच व्याघ्रप्रकल्पात ही वाघीण ‘पीटीआर १२३’ हा नंबर होता. सह्याद्रीत आल्यानंतर तिला ‘एसटीआर ०६’ हा शासकीय नंबर देण्यात आला. तर सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील पर्यटक मार्गदर्शकांनी तिला ‘हिरकणी’ हे नाव दिले आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाची चमू पेंच व्याघ्रप्रकल्पात वाघिणीला नेण्यासाठी तळ ठोकून होती. जी वाघीण आधी ते जेरबंद करणार होते, ती गर्भवती असल्याचे कळले. त्यानंतर ‘लाडो’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या वाघिणीला नेण्याचे ठरले. ती तरुण, निरोगी आणि सह्याद्री व्याघ्रप्रकल्पासाठी अनुकूल अशी वाघीण होती. दीर्घकालीन पुनरुज्जीवन प्रयत्नांचा एक भाग म्हणून सह्याद्रीमध्ये स्थलांतरित होणारी लाडो ही तिसरी वाघीण ठरली आहे. आठ फेब्रुवारी २०२५ ला चंदा ही वाघीण ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आली. तिने सह्याद्रीच्या वातावरणाशी चांगल्या पद्धतीने जुळवून घेतले आहे. ‘सेनापती’ या नर वाघासोबत तीचे मीलन झाल्याची दाट शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर २४ जानेवारीला ‘तारा’ ही वाघीण ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आली.