नागपूर : जगातील आघाडीची गुंतवणूक संस्था असलेल्या प्रेमजी इन्व्हेस्टने महाराष्ट्रात रुग्णालय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी नागपूर आणि मुंबईत रुग्णालये संचालित करणाऱ्या न्यूएरा रुग्णालय समूहासोबत करार करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात तीन नवीन अद्ययावत रुग्णालयांची भर पडून सुमारे २०० डॉक्टरांसह एक हजारांहून अधिक इतर कर्मचाऱ्यांना रोजगार मिळेल. तर रुग्णांना रुग्णशय्या वाढल्यामुळे अद्ययावत वैद्यकीय सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील नागपूर शहरात या गुंतवणुकीच्या मदतीने न्यूएरा रुग्णालयांची एकूण क्षमता ३५० खाटांवरून थेट ८०० खाटांपर्यंत वाढेल. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवांचा लाभ अधिक व्यापक प्रमाणात मिळणार आहे. सध्या न्यूएरा हॉस्पिटल्सकडून नागपुरात दोन तर नवी मुंबईत एक, अशी एकूण तीन रुग्णालये चालवली जात आहेत. मेंदूरोगाशी संबंधित सर्व अद्ययावत उपचार, अवयव प्रत्यारोपण आणि हृदयरोग उपचार यांसारख्या गुंतागुंतीच्या सेवा येथे उपलब्ध आहेत. या समूहाच्या तिन्ही रुग्णालयांत सध्या ३० हून अधिक वेगवेगळ्या शाखांतील तज्ज्ञ रुग्णांना सर्व अद्ययावत सेवा देतात.

त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्यांची सुविधाही येथे उपलब्ध आहे. यासाठी रुग्णालय साखळीत २५० पेक्षा अधिक डॉक्टर आणि सल्लागार कार्यरत आहेत. नवीन गुंतवणुकीबाबत प्रेमजी इन्व्हेस्टचे भागीदार व आरोग्य आणि जीवन विज्ञान विभागाचे प्रमुख प्रकाश चेल्लम म्हणाले, देशातील आरोग्यसेवा व्यवस्थेत अजूनही मोठ्या तफावती आहेत. विशेषतः नागपुरात अधिक खाटांची उपलब्धता आणि भक्कम पायाभूत सुविधांची गरज आहे. न्यूएरा रुग्णालयाचे संस्थापक दर्जेदार आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देत असल्याने या उपक्रमाला आम्ही पाठिंबा देत आहोत, असे चेल्लम म्हणाले.

रोजगार किती मिळणार?

सदर व्यवहारात ‘नोव्हेम अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या गुंतवणूक सल्लागार संस्थेने न्यूएरा हॉस्पिटल्ससाठी एकमेव आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिले. या संस्थेची स्थापना श्रेणिक वोरा यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २०० डॉक्टरांसह एक हजारांहून अधिक परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांना रोजगार मिळणार असून राज्यातील आरोग्यसेवेची पातळी उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.

न्यूएरा रुग्णालय समूहाचे म्हणणे काय?

न्यूएरा रुग्णालय समूहाची स्थापना २०१६ मध्ये डॉ. आनंद सांचेती, डॉ. नीलेश अग्रवाल आणि डॉ. निधीश मिश्रा यांनी केली. डॉ. आनंद सांचेती म्हणाले, प्रेमजी इन्व्हेस्टच्या सहकार्यामुळे उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश अधिक वेगाने साध्य होईल. डॉ. नीलेश अग्रवाल म्हणाले, रुग्णांच्या कठीण काळात विश्वास ठेवता येईल अशी संस्था उभारणे हेच आमचे ध्येय होते; ते साध्य होईल. डॉ. निधीश मिश्रा म्हणाले, या भागीदारीमुळे आम्हाला अधिक वेगाने विस्तार करण्यास आणि राज्यात आमचा प्रभाव वाढवण्यास मदत मिळेल.