नागपूर : दक्षिण अफ्रिकेतून भारतात चित्ता आणण्याच्या तयारीला वेग आला आहे. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या पहिल्या तुकडीत चार नर व चार मादी चित्त्यांचा समावेश आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीला सुरुवात झाली आहे. सात दशकानंतर पहिल्यांदा भारतात चित्ता येणार असून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ते लवकरच धावताना दिसतील. 

भारत सरकार आणि नामिबिया यांच्यात झालेल्या करारानुसार भारतात चित्ता पाठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने नामिबिया सरकारसोबत करार केला होता. या कराराअंतर्गत दोन्ही देश जैवविविधता संरक्षणासोबतच चित्त्याच्या संरक्षणासाठी काम करतील. या करारानंतर चार नर आणि चार मादी चित्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेषज्ञ डॉ. लॉरी मार्कर यांच्या नेतृत्वात नामिबियातील चित्ता संवर्धन निधीच्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या चमूने ही पहिली आरोग्य तपासणी केली.

ऑगस्ट महिन्यातच भारतात चित्ते येतील अशी अपेक्षा होती. मात्र, लांबचा प्रवास आणि वातावरणातील बदल यामुळे त्यांचे आगमन आता सप्टेंबरमध्ये होणार आहे. चित्त्यांना आणल्याबरोबर जंगलात सोडता येणार नाही. त्यांना येथील वातावरणाशी  जुळवून घेण्यासाठी आधी मोठय़ा खुल्या पिंजऱ्यात ठेवण्यात येणार आहे. इथल्या वातावरणाशी एकरूप झाल्यानंतरच त्यांना जंगलात सोडण्यात येईल. भारतातील कुनो राष्ट्रीय उद्यानात  येणारे बहुतेक चित्ते दान करण्यात आले आहेत.

बिबटय़ांची घुसखोरी

दरम्यान, कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांसाठी राखीव ठेवलेल्या क्षेत्रात बिबटय़ांनी प्रवेश केल्याने मध्य प्रदेश वनखात्याची धावपळ उडाली. त्यातील दोन बिबटय़ांना पकडण्यात यश आले आहे. उर्वरित चार बिबटय़ांच्या शोधासाठी सातपुडा व्याघ्रप्रकल्पातील दोन हत्ती तैनात करण्यात आले आहेत.