Prerana Express LHB Coaches Nagpur Ahmedabad : अमरावती: रेल्वे प्रशासनाने प्रेरणा एक्स्प्रेससह तीन गाड्या पारंपारिक डब्यांऐवजी आधुनिक लिंके हॉफमन बुश (एलएचबी) प्रकारचे डबे तसेच सुधारित संरचनेसह कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या रेल्वे गाड्यांमध्ये पुरेशी जागा व आरामदायक प्रवास शक्य होणार आहे. हा बदल १७ आणि १८ जूनदरम्यान लागू होणार असून या एक्सप्रेस गाडयांच्या स्वरूपात बदल होणार आहे.
प्रेरणा एक्स्प्रेसमध्ये सुविधा
गाडी क्र. २२१३७ व २२१३८ नागपूर-अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्सप्रेसची २ वातानुकूलित द्वितीय, ७ वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर कार आणि १ द्वितीय आसन व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना राहील. या एक्प्रेसला एकूण २१ एलएचबी डबे राहणार आहेत. प्रेरणा एक्सप्रेस नागपुरातून बुधवार, शनिवार व रविवारी निघते. बडनेरा स्थानकावर सकाळी १०.४५ वाजता पोहोचते. तसेच अहमदाबादहून निघालेली प्रेरणा एक्सप्रेस बडनेरा स्थानकावर सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास पोहोचते. नागपूर-अहमदाबाद एक्सप्रेस १७ जूनपासून नागपूर येथून सुधारित संरचनेसह धावेल.
डब्यांची लांबी जास्त
एलएचबी डब्यांची लांबी ही पारंपरिक डब्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे एसी प्रथम, द्वितीय, तृतीय व स्लीपर डब्यांमध्ये ८ ते १२ बर्थ जास्त असतात. त्यामुळे प्रत्येक एक्सप्रेसमध्ये डब्यांच्या संख्येनुसार ८ ते १२ प्रवासी जास्त राहतील. त्यामुळे आरक्षण मिळण्याची शक्यताही जास्त असेल. तसेच अनारक्षित सर्वसाधारण डब्यांमध्ये १०० आसनांची सोय असणार आहे. ही आसन संख्या पारंपरिक डब्यांच्या तुलनेत १२ ने जास्त आहे.
एलएचबी डबा आधुनिक
मध्य रेल्वेवरील प्रवाशांची सुरक्षितता आणि चांगल्या सुविधेसाठी सर्वच रेल्वेगाड्यांमधील जुन्या डब्यांच्या जागी एलएचबी डबे कायमस्वरूपी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एलएचबी डबा आधुनिक, स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आला असून या डब्यांमध्ये अँटी-क्लाइंबिंग उपकरणे आणि अग्निरोधक साहित्य यासारख्या अत्याधुनिक सुरक्षा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जुन्या पद्धतीच्या आयसीएफ डब्यांच्या तुलनेत या डब्यांच्या गाडीचा वेग अधिक आहे. आयसीएफ डब्यांच्या गाडीचा वेग १४० किमी प्रतितास आहे. तर, एलएचबी डब्यांचा वेग १६० किमी प्रतितास असून हा वेग २०० किमी प्रतितासापर्यंत वाढवता येईल. त्यामुळे भारतीय रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वेगाड्यांचे आयसीएफ रेल्वेगाड्यांच्या जागी एलएचबी डबे जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागपूर-जयपूर एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-बल्लारशाह एक्स्प्रेसमध्येही ही सुविधा मिळणार आहे.
