काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे डॉ. शशी थरूर हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्यादरम्यान ते दीक्षाभूमीला भेट देणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते डॉ. आशीष देशमुख यांनी दिली. नवी दिल्ली येथे डॉ. शशी थरूर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. देशमुख उपस्थित होते.

हेही वाचा- डॉ. सुधीर गुप्ता यांची उचलबांगडी ! १७ वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणात कारवाई

डॉ. देशमुख हे भाजपाची आमदारकी सोडून काँग्रेसमध्ये परत आले. त्यांना सुरक्षित मतदारसंघ मिळेल, असे वाटत होते. परंतु त्यांना दक्षिण-पश्चिम नागपूर येथून उमेदवारी देण्यात आली. अजूनही ते मतदासंघ शोधत आहेत.

हेही वाचा- “बच्चू कडू यांचा संयम सुटला”; कार्यकर्ता मारहाण प्रकरणावरुन नवनीत राणांची टीका

सावनेर मतदारसंघात पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाने ते चर्चेत आले होते. त्यानंतर विधान परिषदेतील पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांनी राज्यसभेवर महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील व्यक्तीला पाठवण्याच्या पक्षाच्या निर्णयावरही टीका केली होती. आता ते शशी थरूर यांच्या समर्थनार्थ दिल्लीत पोहोचले. थरूर यांच्या दौऱ्याबाबत त्यांनीच माहिती दिली. १ व २ ऑक्टोबरला शशी थरूर नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी समस्त काँग्रेस पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी अवश्य यावे, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.