नागपूर: आजवर सोशल मीडियाकडे एकविसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वाची क्रांती म्हणून पाहिले जात होते. केवळ तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हातात अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देणारे माध्यम असल्याने त्याचे लोण झपाट्याने देशोदेशांमध्ये, अगदी खेड्यापाड्यांमध्येही पसरले. खेड्यांतल्या साध्यासुध्या तरुणांसमोर सारे विश्व खुले झाले आणि त्यांचे म्हणणे त्यांना थेट जगाच्या व्यासपीठावर मांडता येऊ लागले.

पण दुर्दैवाने सोशल मीडियाचा उपयोग केवळ भल्यासाठी होताना दिसत नाही. ही क्रांती दुधारी आहे. याच सोशन मिडीयाचा चुकीचा वापर चक्क राष्ट्रपतींच्या नावाने करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एका दिवसाच्या विदर्भाच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी सुरुवातीला शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

त्यानंतर नागपूरमध्ये आयोजित ब्रह्मकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जामठातील विश्वशांती सरोवर येथे करण्यात आला. मात्र, राष्ट्रपतींच्या संदर्भात एक चुकीची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आली आहे. यावर पीआयबीकडून स्पष्टीकरण पाठवण्यात आले असून राष्ट्रपतींसंदर्भातील ती पोस्ट कशी चुकीचे आहे हे सांगण्यात आले आहे.

सोशल मिडीयावरील संदेशामध्ये राष्ट्रपतींच्या नावाने एक संदेश फिरवला जात आहे. यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संविधानाने राष्ट्रपती बनण्याचा अधिकार दिला असे सांगत आहेत. मात्र, त्याच वेळी धर्माच्या संदर्भात आक्षेपार्ह टीपणी आहे. राष्ट्रपतींनी असा उल्लेख कुठेही केला नाही. या संदेश फेक असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू काय म्हणाल्या होत्या?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, महाराष्ट्राच्या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्य वीर सावरकर आदी महान रत्नांनी देश व जगाला सामाजिक समरसता व राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही राज्याने देशाच्या विकासात महत्वाचे योगदान दिले आहे.

याच महाराष्ट्रात ब्रह्मकुमारीजच्या एकता व विश्वास आधारित राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ होत आहे. यातून आत्मशांती, परस्पर सौहार्द, सकारात्मक विचार आदी जीवनमूल्यांचा समाजात प्रसार होऊन समृद्ध राज्य घडण्यासाठी प्रेरणा मिळेल. हाच मार्ग पुढे देशभर प्रशस्त होऊन परस्परातील भेदभाव सोडून करुणा, परस्पर प्रेम व समन्वयातून विकसित भारतासाठी सर्व जनता एकतेच्या धाग्यात गुंफली जाईल,असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.