नागपूर : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी (१५ एप्रिल) नागपुरातील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेच्या (एम्स) द्वितीय दीक्षांत समारंभात प्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित होत्या. येथे उपस्थितांना उद्बोधन करतांना त्यांनी प्रथम भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि दीक्षाभूमीबाबत महत्वाचे विधान केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, नागपूरच्या या पवित्र भूमीवर आपणा सर्वांच्या उपस्थितीत येऊन मला मनापासून आनंद होत आहे. कालच आपण देशवासीयांनी भारताचे संविधान शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. आज त्यांच्या दीक्षाभूमी येथे असलेल्या नागपूरच्या या भूमीवरून मी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थान असलेल्या एम्स नागपूर येथे आयोजित या दीक्षांत समारंभात पदवी व पदके प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते. आज पदवी आणि पदके मिळविणाऱ्या विद्यार्थिनींना मी विशेष शुभेच्छा देते. या यशामागे योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, संरक्षक आणि शिक्षक यांचेही मी मनापासून कौतुक करते. आपण ज्या परिश्रमाने, निष्ठेने आणि चिकाटीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे, ते अत्यंत प्रशंसनीय आहे. आपण सर्वजण आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला प्रारंभ करत आहात. आज पदवी स्वीकारताना आपण मानवजीवन आणि समाजाच्या कल्याणाशी निगडित एक महत्त्वाची जबाबदारीही स्वीकारत आहात, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

वैद्यकीय क्षेत्र संवेदनशीलतेने मानवतेची सेवा करण्याचा मार्ग

वैद्यकीय क्षेत्र हे केवळ एक व्यवसाय नाही; तर ते संवेदनशीलतेने मानवतेची सेवा करण्याचा मार्ग आहे. एक डॉक्टर केवळ आजारांचे उपचार करत नाही, तर आजारी व्यक्तीच्या मनात आशेचा किरणही निर्माण करतो. आपल्या सहानुभूतिपूर्ण सल्ल्यामुळे रुग्णाबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही आधार मिळतो. अनेकदा डॉक्टरांसमोर कठीण परिस्थिती उभी राहते; मात्र अशा वेळीही रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी संवेदनशीलता कायम ठेवणे आवश्यक आहे. तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनीही वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी नेहमी सन्मानाने वागले पाहिजे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वास टिकवण्यासाठी हे अत्यंत गरजेचे असल्याचेही राष्ट्रपती म्हणाल्या.

देश- विदेशात आपल्या ज्ञान, कार्याचा आदर्श निर्माण करा

एम्स नागपूरने अल्पवधीत वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि उत्कृष्ट आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. येथे शिक्षण घेणे ही अभिमानाची बाब आहे. मला खात्री आहे की येथे आपण केवळ ज्ञान आणि कौशल्यच मिळविले नाही, तर मानवी मूल्ये, नैतिकता आणि सेवा वृत्तीही आत्मसात केली आहे. आपण एम्स नागपूरमधून पदवी घेणाऱ्या प्रारंभीच्या बॅचमधील विद्यार्थी आहात. भविष्यात आपण देश-विदेशात विविध क्षेत्रांत कार्य कराल. आपण जिथेही काम कराल, तिथे आपल्या ज्ञान, कार्य आणि वर्तनातून असा आदर्श निर्माण करा की एम्स नागपूरचे भावी विद्यार्थी आपला अभिमान बाळगतील आणि संस्थेचे नाव उज्ज्वल होईल, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.