नागपूर : वैद्यकीय क्षेत्रात व्यवसायिक पणा आल्याने उपचार महागले आहे. खासगी रुग्णालयातील उपचार अनेकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. डाॅक्टरांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कामुळे डाॅक्टर- रुग्ण संबंधावर समाजात विविध चर्चा होतांना दिसतात. त्यातच डॉक्टर-रुग्ण यांच्यातील विश्वास टिकवण्यासाठी काय करावे? याबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मार्ग सांगितला आहे.
नागपुरातील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेच्या (एम्स) द्वितीय दीक्षांत समारंभात प्रमुख पाहूण्या म्हणून द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून, संवेदनशीलतेने मानवतेची सेवा करण्याचा मार्ग आहे. डॉक्टर केवळ आजारांवर उपचार करत नाहीत, तर रुग्णांच्या मनात आशेचा किरणही निर्माण करतात. सहानुभूतिपूर्ण संवादामुळे रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही आधार मिळतो. कठीण परिस्थितीतही रुग्णांविषयी संवेदनशीलता कायम ठेवणे आवश्यक आहे. तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनीही वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी सन्मानाने वागणे गरजेचे आहे. डॉक्टर-रुग्ण यांच्यातील विश्वास टिकवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशवासीयांचे चांगले आरोग्य हे वैयक्तिक कल्याणाबरोबरच देशाच्या प्रगतीसाठीही महत्त्वाचे आहे. नागरिक निरोगी राहावेत आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेऊ शकावेत यासाठी केंद्र सरकारने मागील दशकात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ ही त्यातील एक महत्त्वाची योजना असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.
देशात ४३.५ कोटी आयुष्यमान कार्ड
देशवासीयांचे चांगले आरोग्य हे त्यांच्या वैयक्तिक कल्याणाइतकेच देशाच्या प्रगतीसाठीही महत्त्वाचे आहे. नागरिक निरोगी राहावेत आणि राष्ट्रनिर्मितीत पूर्ण क्षमतेने योगदान देऊ शकावेत यासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अंतर्गत ४३.५ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड जारी करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण दिले जाते. प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी देशभरात सुमारे १ लाख ८५ हजार ‘आयुष्मान आरोग्य मंदिरे’ स्थापन करण्यात आली आहेत, जी ग्रामीण आणि शहरी भागात नागरिकांच्या जवळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहेत. ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान’ अंतर्गत प्रयोगशाळा, क्रिटिकल केअर युनिट्स आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांचा विस्तार केला जात आहे. तसेच ‘डिजिटल हेल्थ मिशन’, लसीकरण कार्यक्रमांचा विस्तार आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या बळकटीकरणाद्वारे आरोग्य सेवा अधिक परिणामकारक केल्या जात असल्याचेही राष्ट्रपती म्हणाल्या.
देशात गंभीर आजारांवर नियंत्रणासाठी कोणत्या योजना?
गंभीर आजारांवर नियंत्रणासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रम आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी अमृत फार्मसी आणि जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. उच्चस्तरीय वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी देशभरात नवीन एम्स संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ उपचार सुविधाच वाढल्या नाहीत, तर वैद्यकीय शिक्षणाच्या संधीही वाढल्या आहेत. या सर्व प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आरोग्य सेवा अधिक सर्वसमावेशक, सुलभ आणि परवडणारी होत आहे; मात्र या प्रयत्नांना सातत्याने गती देण्याची आवश्यकता असल्याचेही राष्ट्रपती म्हणाल्या.
