अकोला : केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्यावतीने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २५ फेब्रुवारीला शेगावला येथे आल्या होत्या.राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी संस्थानच्या जागेवर हेलिपॅड निर्माण केले होते. त्यासाठी तब्बल ४.१० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली.
आता ते हेलिपॅड उखडण्यात देखील येणार आहे. शासकीय निधीचा हा एकप्रकारे चुराडा असून या मेळाव्यासाठी १० ते १५ कोटींची उधळपट्टी केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.शेगावमध्ये आयुष मंत्रालयाकडून आरोग्य मेळावा घेतला जात आहे.
याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समाज माध्यमावर पोस्ट करीत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांवर निशाणा साधला.
मेळाव्याचा फायदा एकाही शेतकऱ्याला झाला नाही. या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येऊन गेल्या. संत गजानन महाराज संस्थानने एक रुपयाही न घेता तीन हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी जागा नि:शुल्क दिली.
या जागेवर तब्बल चार कोटी १० लाख रुपयांचा निधी खर्च करून हेलिपॅड बनविण्यात आले. राष्ट्रपती निघून गेल्यानंतर आता हे हेलिपॅड उखडण्यात येणार आहे. हे हेलिपॅड बनविण्याचे कंत्राट देखील केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या निकटवर्तीयालाच देण्यात आल्याचे समजते, असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
तर हेलिपॅडचा कायमस्वरूपी उपयोग
हेलिपॅड बनवण्याला विरोध नाही. मात्र, हेच हेलिपॅड थोडी दूरदृष्टी दाखवून शेगावातील सरकारी जागेवर तयार केले असते तर त्याचा कायमस्वरुपी उपयोग झाला असता. केवळ दोन दिवसांसाठी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या चार कोटी १० लाख रुपयांच्या शासकीय निधीचा एकप्रकारे चुराडा झाला. थोडे नियोजन केले असते, तर शेगावला कायमस्वरूपी हेलिपॅड मिळाले असते. संबंधित मंत्र्यांनी ही संधी घालवली, अशी टीका सपकाळ यांनी केली.
लाभार्थी केवळ मंत्री आणि त्यांचे समर्थकच
मेळाव्यासाठी एकूण १० ते १५ कोटींचा खर्च केल्याचा अंदाज आहे. या आरोग्य शिबिरापासून शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्यांना कुठलाच फायदा न झाल्याने ही देखील शासकीय पैश्याची उधळपट्टी ठरली. आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये ७० दालनांचे नियोजन होते. प्रत्यक्षात २० ते २५ दालने लागले. नागरिकांनी याकडे पाठ फिरवली. नियोजनाअभावी ते सपशेल अपयशी ठरले. जनतेच्या कोट्यवधी रुपयांची नियोजनशून्य उधळपट्टी करून त्याचे लाभार्थी केवळ मंत्री आणि त्यांचे समर्थक असल्याचा गंभीर आरोप सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्टमध्ये केला आहे.

