शेगाव (जिल्हा बुलढाणा) : पारंपारिक शेतीला औषधी शेतीची जोड दिल्यास शेतकऱ्यांना साश्वत आर्थिक लाभ मिळेल तसेच जन सामान्यांच्या आरोग्याचे जतन करण्यास मदत होईल. औषधी शेती केवळ लाभदायकच नव्हे तर पर्यावरण रक्षक देखील असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
आयुष चिकित्सा प्रणालीचा व्यापक प्रसार, प्रचार करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान चारदिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे बुधवारी मुर्मू यांच्या हस्ते उदघाटन झाले. गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर हा चार दिवसीय मेळावा झाला.
समारंभास महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री मकरंद पाटील, राज्याचे कामगार मंत्री अडव्होकेट आकाश फुंडकर, जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे, डॉक्टर आशुतोष गुप्ता, राजेश कोटेचा, प्रा. राकेश शर्मा, देवेंद्र त्रिगुणा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्रीमती मुर्मू म्हणाल्या शेगाव च्या पवित्र, भूमीत आल्याने आपणास मनस्वी आनंद झाला. या अध्यात्मिक भूमीत आयुष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामुळे हा मेळावा सर्वार्थाने यशस्वी ठरेल. आपले बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. यामुळे, जडी बुटी, जंगल आयुर्वेद ची पूर्वीपासूनच मनस्वी आवड आहे. आताही मी आयुष चिकित्साला प्राधान्य देते. भारतीय आयुष प्रणालीला जगात मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकार भरीव प्रयत्न करीत आहे. आयुष शैक्षणिक, संशोधन संस्था अत्याधुनिक व्हाव्या यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यंदाच्या अर्थ संकल्पत आयुष साठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगावात आयोजित आरोग्य मेळावा आरोग्य महाकुंभ ठरल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना, आयुर्वेदिक शेती आणि उत्पादन कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि पारंपारिक पिकांसोबत औषधी वनस्पती लागवड करण्याचे आवाहन केले आहे.
ऋषीं म्हणजे त्या काळातील ‘रिसर्च स्कॉलर ‘ असल्याचे सांगून त्यांनी त्या काळात केलेले संशोधन, आजच्या आधुनिक काळाच्याही कसोटीवर उतरले आहे, असे राज्यपाल म्हणाले. यावेळी पालकमंत्री मकरंद पाटील यांचेही समायोचित भाषण झाले. आयुष क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्धल त्रिगुणा, शर्मा, मनीषा कोठेकर यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय, आरोग्यसह विविध क्षेत्रातील मान्यवरासह नागरिक, विद्यार्थी यांची भरगच्च उपस्थिती होती.

