नागपूर: भारताने एकेकाळी असा सुवर्णिम काळ अनुभवला होता, ज्या काळात “वाघ आणि शेळी एकत्र पाणी पित होते”. त्या युगाचे पुनरागमन होईल, असा विश्वास द्रौपदी मुर्मू यांनी नागपुरात व्यक्त केला.

राष्ट्रपती या वेळेस ब्रम्हाकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाच्या आरंभा प्रसंगी बोलत होत्या. त्यांनी सांगितले, “भारताने एकेकाळी सुवर्णयुग अनुभवले आहे, आणि पुन्हा ते युग परत आणण्याचे स्वप्न आपण पाहतो. कोणी त्याला सुवर्णयुग म्हणतात, कोणी विश्वगुरु, तर कोणी स्वर्णिम भारत म्हणतात. ते युग नक्कीच येईल.”

कार्यक्रमात आचार्य देवव्रत, महसूल मंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माऊंटआबू येथील ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त सरचिटणीस बी. के. मृत्युंजय भाई, राजयोगिनी बी. के. चंद्रिका दीदी, नागपूर प्रमुख राजयोगिनी बी. के. रजनी दीदी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम जामठा येथील ब्रम्हाकुमारीज विश्वशांती सरोवर येथे पार पडला.

ब्रम्हाकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा उद्देश समाजात विश्वास, सौहार्द, एकता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक वाढवणे हा आहे. या मोहिमेत आठ मुख्य सिध्दांत निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये व्यसनमुक्त समाजाची निर्मिती, शाश्वत जीवन पद्धती, स्वच्छता, कर्तव्यबोध, मानवतेसाठी कर्तव्यतत्परता, मूल्याधारित शिक्षण, निर्मळ व संयमी जीवन योगा, हरीत व शाश्वत महाराष्ट्र, तसेच सुसंवादातून आनंदी जीवन यावर भर देण्यात आला आहे.

ब्रम्हाकुमारीजच्या प्रतिनिधींच्या मते, या सिध्दांतांच्या माध्यमातून महाराष्ट्रात स्वर्णिम युगाचा अनुभव अधिक दृढ होईल. राज्यातील प्रत्येक तालुका पातळीवरील केंद्रांमार्फत ही मोहीम प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जाणार आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यात्मिक चेतना, सामाजिक समरसता आणि सकारात्मक विचार यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही कार्यक्रमात अधोरेखित केले गेले.

राष्ट्रपतींच्या या विधानामुळे आणि ब्रम्हाकुमारीजच्या मोहिमेच्या माध्यमातून, नागपूरमध्ये एक आशावादी वातावरण निर्माण झाले आहे. उपस्थित मान्यवरांनी यावर भर देत, समाजात शांतता, सहिष्णुता आणि एकजूट वाढीस लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.