नागपूर : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विदर्भ दौऱ्यावर येत असून त्यांच्या नागपूर भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे असल्याने या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.

२५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती नागपूर आणि शेगाव येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. नागपुरातील ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्यक्रमानंतर त्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित ‘राष्ट्रीय आरोग्य मेळा २०२६’चे उद्घाटन करणार आहेत.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालय तर्फे अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेसच्या सहकार्याने २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान चार दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर उद्घाटन समारंभ होणार असून महाराष्ट्राचे राज्यपाल, राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

औषधी वनस्पती लागवड आणि कृषी वनीकरणाद्वारे आयुष औषध प्रणालींबाबत जनजागृती करणे, सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांसाठी नव्या उपजीविकेच्या संधी निर्माण करणे हे या मेळ्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मेळ्यात नागरिकांना आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी आदी आयुष शाखांमार्फत मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला व औषधोपचार मिळणार आहेत.

आयुष क्षेत्रातील उत्कृष्ट उत्पादन पद्धती, गुणवत्ता मानके आणि संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी अनेक औषधनिर्मिती व वेलनेस कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. दैनंदिन आरोग्य गरजांसाठी उपयुक्त औषधी वनस्पती आणि घरगुती उपचारांचे स्वतंत्र प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.

२७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता आयुर्वेदिक शेती, उत्पादन व विपणन या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात तज्ज्ञांकडून औषधी पिकांची लागवड, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पारंपरिक शेतीसोबत आयुर्वेदिक शेतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील नागरिक, शेतकरी, बचत गट, विद्यार्थी आणि आयुष क्षेत्रातील संबंधितांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या राष्ट्रीय उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग औषधी वनस्पतींसाठी राखून ठेवल्याने शेतकऱ्यांना शाश्वत आणि लाभदायी उत्पन्न मिळेल, तर नागरिकांना उच्च दर्जाचे नैसर्गिक उपचार पर्याय उपलब्ध होतील आणि आयुष मूल्य साखळी अधिक मजबूत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधील नागरिक, शेतकरी, बचत गट, विद्यार्थी, आरोग्य स्वयंसेवक आणि आयुष भागधारक यांनी शेगावला भेट देऊन राष्ट्रीय आरोग्य मेळा २०२६ चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि या राष्ट्रीय कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.