शेगाव (बुलडाणा): भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्री गजानन महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर निळकंठ पाटील यांच्यासह आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संत श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने महामहिम राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर राष्ट्रपती महोदयांनी संत श्री गजानन महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदीर परिसराची माहिती घेत पाहणी केली.
आरोग्य प्रदर्शनीची केली पाहणी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते आज बुधवारी श्रीक्षेत्र शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आर्युवेद महासंमेलनाच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६’ चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती महोदयांनी मेळाव्यातील आरोग्य प्रदर्शनीच्या विविध स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली. पारंपरिक भारतीय चिकित्सा पद्धती आणि आधुनिक आरोग्य सुविधांचा संगम असलेल्या या प्रदर्शनाने राष्ट्रपतींचे लक्ष वेधून घेतले. या पाहणी दरम्यान त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष,आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर हे उपस्थित होते.
राष्ट्रपती महोदयांनी प्रदर्शनीमधील विविध पॅथींच्या स्टॉल्सना भेट दिली. तिथे उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पती, उपचार पद्धती आणि रुग्ण तपासणी केंद्रांची सविस्तर माहिती घेतली. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आयुष मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.

