नागपूर : – महाराष्ट्रात सामाजिक एकता, परस्पर विश्वास आणि सकारात्मक मूल्ये अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ब्रह्माकुमारीज संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय “ एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग” अभियानााची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम बुधवार २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता नागपूर येथील ब्रह्माकुमारीज विश्व शांती सरोवर, जामठा येथे आयोजित करण्यात आला आहे. या राज्यस्तरीय कार्यक्रमात भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
“एकता आणि विश्वासद्वारा महाराष्ट्रचा स्वर्णिम युग” च्या मुळ सिद्धांतवर आधारित मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीचा रोडमॅप ब्रह्माकुमारिज द्वारा तयार करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने व्यसनमुक्ती, स्वच्छता, धर्म, शिस्त, सांस्कृतिक मुल्य, शैक्षणिक मुल्य, योगा, हरित महाराष्ट्र आणि आनंदी तणाव मुक्त जीवनशैली आदीबाबींचा अंतर्भाव आहे.
ब्रह्माकुमारीज नागपूर यांच्यावतीने आयोजित या अभियानाचा मुख्य उद्देश समाजात परस्पर विश्वास, बंधुता आणि नैतिक मूल्ये दृढ करणे तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जनजागृती निर्माण करणे हा आहे. या कार्यक्रमाद्वारे आध्यात्मिक चेतना, सामाजिक समरसता आणि सकारात्मक विचारसरणीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. निर्धारित पाससह वेळेपूर्वी उपस्थित राहावे, ओरिजनल आधार कार्ड सोबत ठेवावे तसेच सुरक्षा विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणी https://vishwashantisarovar.org/registration या लिंक वर करू शकता. ऐतिहासिक राज्यस्तरीय अभियानात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ब्रह्माकुमारी रजनी दीदी, यांनी केले आहे.
