scorecardresearch

नागपूर: राष्ट्रपती, पंतप्रधानांसह ‘या’ निमंत्रितांच्या अनुपस्थितीने इंडियन सायन्स कॉंग्रेसमधील उत्साह हरपला

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित १०८ वी इंडियन सायन्स कॉंग्रेस मंगळवारपासून नागपुरात सुरू आहे.

नागपूर: राष्ट्रपती, पंतप्रधानांसह ‘या’ निमंत्रितांच्या अनुपस्थितीने इंडियन सायन्स कॉंग्रेसमधील उत्साह हरपला

उद्घाटनाला पंतप्रदानांची अनुपस्थिती, समारोपला राष्ट्रपतींचा येण्यास नकार, गडकरी व जितेंद्र सिंग या दोन केंद्रीय मंत्र्याचा अपवाद वगळता केंद्र व राज्याच्या मंत्र्यांनी फिरवलेली पाठ यामुळे १९७४ नंतर प्रथमच नागपूरमध्ये भरलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमधील उत्साहच हरपल्याचे चित्र दिसून आले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित १०८ वी इंडियन सायन्स कॉंग्रेस मंगळवारपासून नागपुरात सुरू आहे. शनिवारी या परिषदेचा समारोप होणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार सायन्स कॉंंग्रेसचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते तर समारोप राष्ट्रपतींच्या उपस्थित होणार होता.

पंतप्रधानांच्याच हस्ते सायन्स कॉंग्रेसच्या उद्घाटनाची परंपरा आहे. नागपूरमध्ये पंतप्रधानांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापेक्षा दूरदृश्यप्रणालीव्दारे परिषदेचे उद्घाटन केले. त्यानंतर समारोपाला राष्ट्रपतींनी येण्यास नकार कळविला. त्यानंतर नकाराची पंरपराच सुरू झाली. आदिवासींच्या सत्रासाठी केंद्रीय आदिवासी मंत्री आले नाही. महिला वैज्ञानिकांच्या संमेलनाला येणाऱ्या उद्योगपती टीना अंबानी अनुपस्थित होत्या. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद सोडला तर विज्ञान, तंत्रज्ञान या सारख्या व्यापक विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेत विविध सरकारी विभागाचा समावेश असतानाही संबंधित खात्याचे राज्य व केंद्राच्या मंत्र्यानी पाठ फिरवली.

हेही वाचा >>> भाजप-शिंदे गटाविरोधात आ. बच्चू कडूंनी थोपाटले दंड!, विधान परिषद निवडणुकीत ‘प्रहार’चे उमेदवार भाजपला भिडणार

परिषदेकडे पाठ फिरवणाऱ्यांमध्ये फक्त मंत्रीच नाही तर विविध क्षेत्रातील निमंत्रितांचाही समावेश आहे. यामुळे परिषदेतील उत्साह मावळल्याचे चित्र पहिल्या दोन दिवसात होते. विविध संशोधनात्मक विषयांवर आयोजित संत्रांमधील नगण्य उपस्थिती हीच बाब स्पष्ट करीत होती. शुक्रवारी तर परिसंवादातील उपस्थिती बोटावर मोजण्या इ तकी होती. परिषदेच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान प्रदर्शनीत पहिले दोन दिवस विविध संशोधन संस्थांच्या दालनात विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पण नंतर मात्र अनेक दालनात संबंधित विषयाची माहिती देणाऱ्यांचाही वाणवा होता. भारतीय वैद्यकीय संशोधक परिषदेच्या दालनाचा त्याला अपवाद होता. राज्य सरकारची दालने केवळ औपचारिकतेसाठी उघडली की काय असे चित्र या विज्ञान प्रदर्शनात होते.

हेही वाचा >>> “उत्तरप्रदेशचं माहिती नाही, पण मुंबईत ५२१ एकरवर फिल्मसिटी उभारणार”, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

शेवटच्या टप्प्यात शालेय विद्यार्थी येऊ लागल्याने प्रदर्शनस्थळी गर्दी वाढली पण परिषदेचे महत्व लक्षात घेता येथे येणाऱ्यामद्ये अपेक्षित असणाऱ्यांची (वैद्यानिक, संशोधक) संख्या कमी दिसून आली. परिषदेच्या निमित्ताने देशभरातील संशोधकांशी संवाद साधण्याची संधी नागपूरकरांना मिळणार होती. इस्रो, डीआरडीओसह काही तत्सम संस्थां सोडल्या तर इतरही महत्वाच्या विभागाशी माध्यमांशी संवाद घडवून आणण्यातही आयोजकांना यश आले नाही. त्यामुळे अत्यंत महत्वाच्या अशा इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये उत्साह दिसून आला नाही,अशी चर्चा परिषद स्थळी होती.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 18:05 IST

संबंधित बातम्या