यवतमाळ : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’नंगारा म्युझियमचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होत आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच पोहरादेवीत येत आहे.
कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कार्यक्रमाचे आयोजक तथा यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, विविध राज्यातील बंजारा लोकप्रतिनिधी, महंत आदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता पोहरादेवी येथे पोहोचणार आहेत. येथे जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. तसेच बंजारा विरासत नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्य सभेत जनतेला संबोधित करतील.
हे ही वाचा…नवरात्रच्या पहिल्याच दिवशी ‘आपली बस’ची चाके थांबल्याने नागपूरकरांचे हाल…भाजप समर्थित संघटनेनेच…,
पोहरादेवी येथे येणाऱ्या प्रत्येकास देशभरातील बंजारा समाजाचे संपूर्ण दर्शन व्हावे या दृष्टीकोनातून मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे नंगारा वास्तूसंग्रहालय साकारण्यात आले आहे. २०१८ मध्ये या वास्तुसंग्रहालायाचे भूमिपूजन झाले होते. नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन बंजारा समन्वय समितीने केले आहे.
कसे आहे संग्रहालय
१६ एकर परिसरात पारंपरिक आणि आधुनिक वास्तुकलेचा मेळ घालून उभारलेले नंगारा वास्तू संग्रहालय पाच मजली आहे. त्यात १३ विविध गॅलरी असून येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन होणार आहे. याशिवाय फ्लाईंग थिएटर, मुव्हिंग प्लॅटफॉर्म, रमलिंग प्लॅटफॉर्म अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध सात भाषांमध्ये येथील माहिती व बंजारा समाजाचा इतिहास प्रेक्षकांना समजून घेता येणार आहे. नंगारावर भव्य अशी १६० फूट बाय ३० फूट एलईडी स्क्रीन लावण्यात आली असून अर्धा किमी अंतरावरूनही स्क्रीनवरील दृश्य बघाता येणार आहे. १५० फूट उंच सेवाध्वज, संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. येथे दररोज सायंकाळी ७ वाजतापासून लेझरसहित लाईट आणि साऊंड शो होणार आहे. हे संग्रहालय बघायला जवळपास ९० मिनिटे लागतात. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमूना असलेले वेगळे संग्रहालय आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण झाल्यानंतर दररोज हे संग्रहालय पर्यटकांना बघता येणार आहे. नंगारा म्युझियममुळे पोहरादेवी पर्यटनाच्या नकाशावर येणार असून येथील रोजगारवाढीस चालना मिळणार आहे.