नागपूर : मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतल्यास त्यांना शिक्षेत सवलत दिली जाते. या योजनेंतर्गत राज्यभरातील १० कारागृहातील २ हजार ८५६ कैद्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. यावर्षी पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या २१४ कैद्यांची ३ महिने तर पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या १४ कैद्यांची सहा महिन्यांची शिक्षा माफ करण्यात आली.
याबाबत पुणे कारागृह मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक कैद्यांचे शिक्षण अर्धवट राहिलेले असते. काही कैद्यांना कारागृहात आल्यावर शिक्षणाची आवड निर्माण होते. त्यामुळे शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्यांना राज्य शासन संधी उपलब्ध करून देते. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कैद्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. २०१७ पासून २०२४ पर्यंत राज्यातील २ हजार ८५६ कैद्यांनी पदवी व पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले . यात २ हजार १९९ पुरुष तर २०७ महिला कैदी आहेत. शिक्षण घेणाऱ्या कैद्यांना शिक्षेत सवलत देण्यात आली आहे.
कैद्यांसाठी अभ्यासक्रम
येरवडा, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, मुंबई, तळोजा, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक मध्यवर्ती कारागृहात अभ्यासकेंद्र आहेत. त्यामध्ये बी.ए., एम.ए., बी.कॉम., एम.कॉम. हे अभ्यासक्रम आहेत. तसेच योगशिक्षक, बालसंगोपन, आरोग्यमित्र, मानवी हक्क आणि गांधी विचार दर्शन असे प्रमाणपत्र अभ्यासक्रमही आहेत. महिला कैद्यांसाठी ब्युटी पार्लर, शिवणकाम, शेती उत्पादन, इंटेरिअर डिझाईन डेकोरेशन, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी असे कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवले जातात.
हे ही वाचा…नागपूर : वादग्रस्त वक्तव्य टाळा, फडणवीस यांचा नितेश राणेंना सल्ला
अशी दिली जाते सूट
कारागृहात शिक्षा भोगताना अनेक कैदी पश्चातापाच्या अग्नीत जळत असतात. वागणुकीत सकारात्मक बदल असलेले कैदी शिक्षणाकडे वळतात. राज्य शासनाकडून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कैद्यांना शिक्षेत तीन महिने सूट दिल्या जाते. तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कैद्यांना शिक्षेत थेट सहा महिन्यांची सूट दिली जाते. कैद्यांना लवकर सोडल्यामुळे कारागृहातील कैद्यांची गर्दीसुद्धा कमी होत आहे, हे विशेष.