नागपूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक वेगाने एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मनुष्याचा प्रयत्न आहे. अलिकडे एका खासगी विमानाला अपघात झाल्याने उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा मृत्यू झाला आहे. हे वृत्त येऊन काही दिवस होत नाही तोच नागपूर विमानतळावर गेल्या वर्षभरात खासगी विमान आणि खासगी हेलिकॉप्टर वर्दळ वाढल्याची बाब समोर आली आहे.

अजीत पवार यांच्या विमानाला अपघात हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हा अपघात संशयास्पद असल्याचे मत व्यक्त करताना, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना छोट्या व खासगी विमानाने प्रवास टाळण्याचा सल्ला देणार असल्याचे म्हटले आहे. गडकरी यांची विमानतळावर भेट झाल्यास हा सल्ला देईन, असेही ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वर्षभरात खासगी विमान आणि हेलिकॉप्टरच्या वर्दळीत लक्षणीय वाढ झाली आहे. औद्योगिक विस्तार, खाण उद्योगाची वाढ तसेच राजकीय घडामोडींमुळे अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचाली वाढल्याने नागपूर विमानतळ खासगी विमानसेवेचे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.

मिहान इंडिया लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात नागपूर विमानतळावर एकूण १ हजार ६११ खासगी विमाने आणि ३३२ खासगी हेलिकॉप्टर उतरले. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. विशेषतः उद्योगपती, गुंतवणूकदार, राजकीय नेते तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

या काळात तांत्रिक कारणामुळे तसेच पक्ष्यांच्या हालचालींमुळे दहा विमानांना आपत्कालीन लँडिंग करावे लागले, तर एका विमानाचे उड्डाण रद्द झाले. याशिवाय, विमानतळावरील वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढल्याने २ हजार ३९४ विमाने विलंबाने आली, तर २ हजार ४०४ विमाने उशिराने रवाना झाली.

भविष्यात विमानतळावरील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असून, वाढत्या वाहतुकीला सामोरे जाण्यासाठी नवीन टर्मिनल आणि सुधारित व्यवस्थापनावर भर देण्यात येणार असल्याचे संकेत विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

११५८ विमाने रद्द

या कालावधीत तांत्रिक अडचणी व हवामानातील बदल यांचा परिणाम वेळापत्रकावर झाल्याचे दिसून येते. या काळात नागपुरातून एकूण ५७९ जाणारी आणि ५७९ येणारी विमाने रद्द करण्यात आली. यामध्ये इंडिगो एअरलाईन्सच्या ४९३ जाणाऱ्या आणि ४९३ येणाऱ्या विमानांचा समावेश आहे.