चंद्रपूर:ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांसह इतर वन्यप्राण्यांची तहाण भागविणाऱ्या, एकप्रकारे वन्यप्राण्यांसाठी जीवनदाहिनी ठरलेल्या अंधारी नदीच्या पात्रात वाळू माफियांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. अंधारी नदी घाटाच्या ठेकेदाराला केवळ ३ हजार ४०० ब्रास वाळू उपसण्याची परवानगी होती. मात्र, त्याने चार पट अधिक तब्बल १० ते १२ हजार ब्रास वाळू उपसल्याचे समोर आले आहे. तसेच वन विभागाचा संपूर्ण रस्ता उध्वस्त केला. या प्रकरणी पोकलेन मशीन जप्त करत अश्विनसिंग ठाकूर याच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या वाळू माफियाला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्याने या माफियाची हिम्मत बळावली आहे. या जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने वाळू माफिया चांगलेच फोफावले आहेत. या वाळू माफियांची हिम्मत इतकी वाढली आहे मी वाघांचे नैसिर्गिक पाणी स्त्रोत असलेल्या अंधारी नदीवरच या माफियांनी हैदोस घालण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील विविध वाळू घाटांचे लिलाव मे महिन्यात करण्यात आले.
यामध्ये ठेकेदारांना घाटातून मर्यादित प्रमाणात वाळू उपसण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वाळू माफियांनी या मर्यादांचा भंग करत परवानगीच्या चारपट वाळू उपसली असून, त्यामुळे पर्यावरणाचा आणि नदीपात्राचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. अजयपूर येथील अंधारी नदी घाटाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला केवळ ३ हजार ४०० ब्रास वाळू उपसण्याची परवानगी होती. मात्र, तेथून तब्बल १० ते १२ हजार ब्रास वाळू उपसल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, या नदीपात्रात जेसीबी किंवा पोकलेनसारखी यंत्रसामग्री वापरण्यास बंदी असताना सर्रासपणे मोठ्या यंत्रांद्वारे वाळू उपसा सुरू होता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वाहणाऱ्या अंधारी नदीतून होत असलेल्या या बेकायदेशीर वाळू उपशामुळे जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. हा परिसर वन्यजीवांच्या संवेदनशील अधिवासात येतो. या भागात वाघ, बिबट तसेच इतर वन्यजीवांचे वास्तव्य आहे. तेव्हा अशा अतिसंवेदनशील भागात वाळू उपशाचे काम करतांन काळजी घेणे बंधनकारक आहे. मात्र येथे वन विभागाचा रस्ता उध्वस्त करून संपूर्ण नदी पोखरण्यात आली.
विशेष म्हणजे १० जूननंतर रेती उत्खननावर बंदी असतानाही उत्खनन सुरूच असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, अंधारी नदीत बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या रेती तस्करांविरुद्ध वनविभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या क्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी पोकलेन मशीन जप्त करत अश्विनसिंग ठाकूर याच्यावर वन गुन्हा दाखल केला आहे. यामुळे इतर वाळू माफियांचेही धाबे दणाणले आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकर यांच्याशी संपर्क साधला असता, वन विभागाचा रस्ता पूणता खराब केल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती दिली.
विशेष म्हणजे वाळू माफियांचा हैदोस सुरू असतांना जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, तहसील कार्यालयातील अधिकारी मुग गिळून चुप बसले होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्यापही मोठ्या प्रमाणावर वाळूचे बेकायदेशीर उत्खनन सुरू असून महसूल विभागाची यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. पर्यावरण संरक्षणासाठी आणि नैसर्गिक संपत्तीच्या रक्षणासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.