नागपूर : वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात दोन नवीन खासगी आरोग्य विद्यापीठे स्थापन करण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांच्याशी संलग्न होणाऱ्या महाविद्यालयांतील प्रवेशरचना बदलणार आहे. पूर्वी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी असलेला ८५ टक्के वाटा आता केवळ ४० टक्क्यांवर येणार असून, नव्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती किंवा शुल्क प्रतिपूर्तीचाही लाभ मिळणार नाही. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे.
कोणती वैद्यकीय महाविद्यालये नव्या व्यवस्थेत जाणार?
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २५ ऑगस्टला प्रसिद्ध केलेल्या नीट-यूजी २०२६ प्रवेश सूचनेत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर; एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर; आणि रणजित देशमुख दंत महाविद्यालय व संशोधन केंद्र, नागपूर या तीन संस्थांचा उल्लेख आहे. ही महाविद्यालये खासगी विद्यापीठ स्थापनेच्या प्रक्रियेत आहेत.
यंदाच्या पहिल्या फेरीत प्रवेश मिळणार का?
नाही. आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ही महाविद्यालये पुढील प्रवेश फेरीत सहभागी होतील. त्यामुळे पहिल्या फेरीत त्यांचा समावेश होणार नाही.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा वाटा किती राहणार?
नवीन खासगी आरोग्य विद्यापीठातील एकूण प्रवेश क्षमतेच्या ४० टक्के जागा महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहतील. उर्वरित ६० टक्के जागा राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहतील. प्रवेश क्षमता वाढली नाही तर राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष वाटा कमी होण्याची शक्यता आहे.
शिष्यवृत्तीचे काय?
नवीन खासगी विद्यापीठाने स्थापन केलेल्या शुल्क निर्धारण समितीने निश्चित केलेले शुल्क लागू होईल. या विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाची कोणतीही शिष्यवृत्ती अथवा शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू राहणार नाही, असे प्रवेश कक्षाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विशेषतः मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
प्रवेशाची पद्धत काय असेल?
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संदर्भीय पत्रानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. नवीन आरोग्य विद्यापीठातील ४० टक्के जागा महाराष्ट्र अधिवासधारकांसाठी उपलब्ध राहतील.
सीईटी आयुक्त काय म्हणतात…
नवीन आरोग्य विद्यापीठातील ४० टक्के जागा महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्रधारकांसाठी उपलब्ध राहतील. नवीन खासगी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्यांना कोणतीही शिष्यवृत्ती अथवा शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू राहणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबईचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.
