पेट्रोलपंप चालकांची गेल्या काही वर्षांत गुंतवणूक दुप्पटीने वाढली, परंतु या क्षेत्राबाबत शासनाचे धोरण नाही. त्यामुळे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने विविध मागण्यांसाठी ३१ मे रोजी पेट्रोल-डिझेल खरेदी बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रासह देशातील १९ राज्यांत खासगी पेट्रोलपंप कोरडे पडून सामान्यांना मन:स्ताप होण्याचा धोका आहे.

फेडरेशन नुसार, पेट्रोलियम डिलर्स वर्षानुवर्ष २४ तास देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी राबत आहे. नोदबंदीसारख्या आव्हानात्मक निर्णयात आम्ही शासनाला पूर्ण सहकार्य केले. त्यानंतरच्या प्रशासकीय चौकशीच्या फेऱ्याला आम्हाला सामोरे जावे लागले. करोना काळातही आम्ही जीवाची जोखीम स्विकारून सेवा दिली. तर गेल्या पाच वर्षात आमच्या भांडवली गुंतवणुकीत दुप्पटीने वाढ झाली. मात्र आमचे उत्पन्न वाढले नाही. चुकीच्या दरबदलाच्या धोरणांमुळे अनेकदा आम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. इंधनाचे दर बदल करतांना डिलर्सना कधीही विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे दर कमी झाल्यावर डिलर्सचे प्रचंड नुकसान होते. पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांसाठी कोणतेही धोरण नाही. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांसाठी शासनाने एक धोरण तयार करण्याची गरज आहे.

या मागणीसाठी ३१ मे २०२२ रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. दरम्यान विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता म्हणाले, “या दिवशी आमच्याकडील शिल्लक सर्व पेट्रोल व डिझेल साठा असेपर्यंत विक्री केले जाईल.परंतु पंपावरील साठा संपल्यावर नवीन पेट्रोल ३१ मे रोजी एक दिवस कुणीही डिलर कंपनीकडून खरेदी करणार नाही.” हे आंदोलन देशातील १९ राज्यांत असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे या आंदोलनाने ३१ मे रोजी बरेच पेट्रोलपंप कोरडे पडण्याची शक्यता आहे.