नागपूर : महापालिकेची क्षमता असतानाही केवळ खाजगीकरणामुळे शहरातील अनेक विकास कामे होऊ शकली नाहीत. शिवाय अनेक कंपन्यांना कोटय़वधी रुपये दिले पण महापालिकेला त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट सोयीसुविधांपासून जनता वंचित राहिली. या खाजगीकरणातून महापालिकेत भ्रष्टाचार वाढला, असे मत माजी नगरसेविका व राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी व्यक्त केले.
आभा पांडे यांनी लोकसत्ता कार्यालयाला भेट दिली असता त्या बोलत होत्या. आभा पांडे म्हणाल्या, महापालिकेत गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. पण, केवळ त्यांनी पक्षातील नेत्यांचा व कार्यकर्त्यांच्या फायद्यासाठी कंत्राटे दिली. कचऱ्याचे कंत्राट ज्या दोन कंपन्यांना देण्यात आले त्यांच्यावर महापालिकेचे कुठलेच नियंत्रण नाही. २४ बाय ७ योजना शहरात राबवली जात आहे. त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. पाण्याची समस्या कायमच आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांपासून पाण्याच्या प्रश्नावर ओरडतो पण भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले. शहर बससेवेचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आले. आता बससेवा तोटय़ात आहे. शहरात सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. पण, त्यात सुद्धा घोळ आहे. रस्ते चांगले नाही. डांबरी रस्ते दर सहा महिन्यांनी करावे लागत आहेत. यातही मोठा भ्रष्टाचार आहे.
मेट्रोला आपण जमीन दिली. पण, त्याचा महापालिकेला काय फायदा झाला? पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा काही कामे झाली नाहीत. वृक्षारोपण अभियान दरवर्षी राबवण्यात आले मात्र अनेक भागात झाडे नष्ट झाली. त्यातही मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. प्रशासनातील अधिकारी
या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत की काय अशी शंका आता येऊ लागली आहे.
महापालिकेत अनेक पदाधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी खाजगी वाहनांचा वापर केला. त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. या खाजगी वाहनांचा घोटाळा समोर आणला होता मात्र त्यातही काहीच झाले नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर निधी मिळाला नाही अशी ओरड सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. मात्र महापालिकेत निधी येऊनही योग्य नियोजन करण्यात आले नाही. केंद्र सरकारच्या निधीचा उपयोग विकास कामासाठी करण्यात आला नाही.
झोपडपट्टीवासीय मालकी हक्कापासून वंचित आहेत. भाजपने घरकुलाचा किंवा मालकी हक्काचे पट्टे वाटपाचा केवळ गाजावाजा केला. मात्र प्रत्यक्षात अनेकांना याचा लाभ मिळाला नाही. मालमत्ता कराबाबत एका आमदाराच्या नातेवाईकाच्या कंपनीला काम देण्यात आले. त्यातही मोठा घोळ झाला आहे. पंधरा वर्षांत भ्रष्टाचार झाला. स्टेशनरी घोटाळा, करोना समुग्री घोटाळा, बाक घोटाळा हे घोटाळे केवळ पदाधिकारी व प्रशासनाच्या साठगाठीमुळे
झाले आहेत, असा आरोप पांडे यांनी केला.
महापालिकेत विरोधी पक्ष सक्षम नसल्यामुळे सत्तापक्षावर कोणाचा धाक नव्हता. त्यामुळे भाजपला सर्व रान मोकळे होते. परंतु, आता आगामी महापालिका निवडणुकीत हा भ्रष्ट कारभार आम्ही जनतेसमोर आणणार असल्याचे त्यांनी संगितले.
महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न
महिलांच्या प्रश्नांवर राज्य महिला आयोग चांगले काम करत असून अनेक प्रकरणात महिलांना न्याय दिला जात आहे. काही प्रकरण ही कौटुंबिक असून ती संवेदनशील असतात त्यामुळे ते हाताळताना खूप जबाबदारीने त्यातून मार्ग काढावा लागतो. सर्वच महिलांची प्रकरणे भरोसा सेलला पाठवत असतो. परंतु, त्यातून मार्ग काहीच निघत नाही. जी खाजगी कार्यालये आहे त्या कार्यालयात जाऊन आता आम्ही तेथील महिलांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. मध्यवर्ती कारागृहात नुकतीच भेट दिली. त्या ठिकाणी महिला कैद्यांसाठी चांगले काम केले जात आहे. शासनाच्या योजनाचा महिलांना लाभ होतो की नाही याबाब विदर्भात आढावा घेतला जात आहे. नुकताच गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेतला. महिलांचे सक्षमीकरण करण्यासोबत त्यांच्यावर झालेल्या अन्याय दूर कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असेही आभा पांडे यांनी सांगितले.