महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : वैद्यकीय शिक्षण खात्याने ८ एप्रिलला चार प्राध्यापकांची कोल्हापूरसह इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातापदी पदोन्नती केली; परंतु कोल्हापूरला पदस्थापना असलेल्या व तूर्तास अकोल्यात प्रतिनियुक्तीवर असलेल्या डॉ. मीनाक्षी वाहने (गजभिये) यांचे आताही कोल्हापूरहून वेतन निघत आहे. त्यातच आता आणखी एक अधिष्ठात्याच्या कोल्हापूरला पदस्थापनेचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे येथून दोघांचे वेतन निघणार कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत राज्यात २१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. यापैकी कोल्हापूरच्या महाविद्यालयात २०२० मध्ये अधिष्ठाता म्हणून डॉ. मीनाक्षी वाहने (गजभिये) यांना जबाबदारी सोपवण्यात आली. काही महिन्यांनी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात समस्या उद्भवल्यावर त्यांना प्रतिनियुक्तीवर अकोला येथे पाठवले गेले. या वेळी डॉ. वाहने यांची पदस्थापना बदलण्याचे आदेश नव्हते. त्यामुळे आजही त्यांना कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातूनच अधिष्ठाता पदाचे वेतन मिळते.

दरम्यान, शासनाने ८ एप्रिलला कोल्हापूरच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रदीप दीक्षित यांची कोल्हापूरच्या अधिष्ठातापदी, चंद्रपूरच्या कान- नाक- घसा रोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अशोक नितनवरे यांची चंद्रपूरचे अधिष्ठाता, पुण्याचे प्रा. डॉ. विनायक काळे यांची तेथील अधिष्ठातापदी, तर नांदेडचे डॉ. दिलीप म्हैसेकर यांची तेथेच अधिष्ठातापदी पदोन्नतीचे आदेश काढले. विभागीय पदोन्नतीच्या या आदेशात सगळय़ांना तातडीने पदभार स्वीकारण्यास सांगून अधिष्ठाता पदाची वेतनश्रेणी मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे; परंतु कोल्हापूरच्या पदस्थापनेवरील डॉ. वाहने यांच्याबाबतीत आदेश नाही. त्यामुळे त्यांचे वेतन कोल्हापूरहूनच होत असताना डॉ. दीक्षित यांना तेथील कायम अधिष्ठाता पदाचे सूत्र व वेतन कसे मिळणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विषयावर वैद्यकीय शिक्षण खात्याचे आयुक्त विरेंद्र सिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

वैद्यकीय शिक्षण खात्याने डॉ. मीनाक्षी वाहने यांना प्रतिनियुक्तीवर अकोल्याची जबाबदारी दिली आहे. पहिल्या टप्प्यात विभागीय पदोन्नतीसह तात्पुरत्या स्वरूपात काही अधिष्ठात्यांना कोल्हापूरसह इतर महाविद्यालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे; परंतु शासनाला कोल्हापूरचे प्रकरण माहीत असल्याने दुसऱ्या टप्प्यात डॉ. वाहने यांच्याबाबतही आदेश निघेल.

डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.