भूमी अभिलेखमधील पदोन्नती लालफितीत अडकली

भूमी अभिलेखमधील गटसमूह दोनमधील कर्मचाऱ्यांची पदोन्नती उपअधीक्षक भूमी अभिलेख या पदावर होते.

नागपूर : एकीकडे विविध योजनांच्या अंमलबजावणीचा भार व दुसरीकडे दीड वर्षापासून वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीमुळे राज्यभर या विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. राज्यभरातील शंभरावर कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे.

भूमी अभिलेखमधील गटसमूह दोनमधील कर्मचाऱ्यांची पदोन्नती उपअधीक्षक भूमी अभिलेख या पदावर होते. सर्वसाधारणपणे राज्यभरात ३०० हून अधिक पदे आहेत. या पदावर मुख्यालय साहाय्यक आणि शिरस्तेदारांना पदोन्नती दिली जाते. दीड वर्षापूर्वी पदोन्नतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यासाठी आवश्यक असणारी विभागीय पदोन्नती समितीची बैठकही झाली. शंभरपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनदरबारी म्हणजे महसूल खात्याकडे पाठवण्यात आला. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झाला नाही, असे भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.

मुख्यालय साहाय्यक व शिरस्तेदार यांच्या पदोन्नत्या थांबल्याने या पदाखालील ‘क’ गटातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्याही होऊ शकल्या नाहीत. विशेष म्हणजे, या दरम्यान पदोन्नतीसाठी पात्र असणारे कर्मचारी प्रतीक्षेतच सेवानिवृत्त झाले. त्यामुळे ते आर्थिक लाभापासून वंचित राहिले. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

भूमी अभिलेखमध्ये पदभरती होत नसल्याने अनेक पदे रिक्त आहेत. एका एका कर्मचाऱ्यावर अतिरिक्त कार्यभार सोपवला जातो.

यासंदर्भात भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर म्हणाले, पदसमूह दोनमधील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागला तर त्यांच्या जागेवर इतरांना संधी मिळेल. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Promotion in the land records got stuck in the red tape akp

ताज्या बातम्या