नागपूर: राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्या म्हणून ज्या जागांचा प्रस्ताव भाजपकडून आला, त्यात नागपूरचा समावेश नव्हता, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे सांगितले. येथे भाजपचे बावनकुळे व काँग्रेसचे डॉ. रवींद्र भोयर अशी थेट लढत होणार आहे.

धुळे-नंदुरबार व कोल्हापूर या दोन जागांसाठीच प्रस्ताव होते. त्यानुसार तेथे निवडणुका बिनविरोध होतील. यापैकी कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी तर धुळे-नंदुरबारची जागा भाजपसाठी सोडण्यात आली आहे. नागपूरच्या जागेवरून काँग्रेस माघार घेणार व ही जागा भाजपसाठी सोडणार अशी चर्चा दिवसभर नागपुरात होती. या जागेसाठी काँग्रेसने भाजपमधून आलेल्या डॉ. रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यांचे काय होणार, अशीही चर्चा होती. पटोले यांनी नागपुरात काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांशी बैठक घेतली व या मुद्याावर चर्चा केली. त्यानंतर नागपूरमधून काँग्रेस लढणार असल्याचे स्पष्ट केले व बिनविरोध निवडणुकीबाबत  नागपूरच्या जागेसाठी भाजपचा प्रस्ताव नव्हता, असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार मार्चमध्ये जाणार,  असे वक्तव्य भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. त्याबाबत ते म्हणाले.  भविष्यवाणी करण्याची सवय भाजपला आहे, आमचे सरकार पाच वर्षे चालेल. नागपूरमध्ये महाविकास आघाडीत मतभेद नाहीत.