समृद्धी महामार्गामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर, लोणार तालुक्यातील शेत रस्ते, पाण्याचे प्रवाह बाधित झाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. संबंधित अधिकारी व कंत्राटदार शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करून मेहरकचे शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांनी सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग कामामुळे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आमदारांनी आंदोलन सुरू करून सरकारला घरचा आहेर दिला आहे.
समृद्धी महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातून जातो. या महामार्गाच्या कामामुळे शेतातील नदी, नाल्याचे प्रवाह बदलले आहेत. शेतात जाण्याचे रस्ते पूर्णत: खराब झाले, परिसरातील मोठे क्षेत्र बाधित झाले. महामार्गाच्या खालून जाणारे रस्ते अतिशय अरुंद असल्याने बैलगाडी सुद्धा जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी अर्धा किलोमीटर दुरून जावे लागते. संबंधित अधिकारी व कंत्राटदार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही. ते शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करून आज शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वात असंख्य शेतकऱ्यांनी मेहकर येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली.
समृद्धी महामार्गाच्या कामामुळे मेहकर, लोणार तालुक्यातील जवळपास १०० किमी रस्ते खाराब झाले आहेत. ते तात्काळ दुरुस्त करून द्यावे, पालखी मार्ग तात्काळ दुरुस्त करावा, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते करून द्यावे, नदी, नाल्याचे प्रवाह पूर्वीप्रमाणे करून द्यावे, या मागण्यांसाठी आ.रायमुलकर यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत.
महामार्गाला विरोध नाही
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या समृद्धी महामार्गाला आमचा विरोध नसून सर्वप्रथम आमच्या शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमिनी दिल्याचे आमदार संजय रायमुलकर यांनी सांगितले. या महामार्गाच्या कामामुळे रस्ते, पाण्याचे प्रवाह बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ते पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने उपोषण करीत असल्याचे आ.रायमुलकर म्हणाले.