नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना संचालनालयाने (ईडी) केलेली अटक सूडबुद्धीने के ल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काटोल तालुक्यात विविध ठिकाणी निषेध व चक्काजाम आंदोलन केले. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुखांना ईडीने २ नोव्हेंबरला अटक केली. ईडीच्या विशेष न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे. याशिवाय ईडीने त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स बजावला आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून देशमुखांवरील सर्व आरोप निराधार आहेत असा आरोप करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अटकेचा निषेध केला. अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या काटोल नरखेड तालुक्यातील विविध १५ ठिकाणी  कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यामध्ये खांबही, गोंदीडीग्रस, सहजापूर, गोंडीमोहगाव, मसखापरा, भिष्णुर, पिंपळगाव, मसखापरा, येनवा, कोहळा, तिनखेडा, दिग्रस (बु) या गावात केंद्र सरकार आणि ईडीचा निषेध करण्यात आला.