अकोला : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शासकीय कार्यक्रमादरम्यान नियुक्तीपत्र देताना एका मुस्लीम महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावरचा हिजाब ओढून काढल्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ अकोला शहरातील मोहम्मद अली चौकात मंगळवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रतीकात्मक स्वरूपात नितीश कुमार यांच्या छायाचित्राला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला. नितीश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

बिहार राज्यातील एका शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कृतीने नव्या वादाला तोंड फुटले आहे. नियुक्तीपत्र देताना एका मुस्लीम महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावरचा हिजाब ओढून काढल्याची कथित चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली. त्यावरून नितीश कुमार यांच्यावर टीका केली जात आहे. या घटनेचे पडसाद अकोल्यात देखील उमटले. नितीश कुमार यांचा तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनात सहभागी नागरिकांनी ‘नितीश कुमार मुर्दाबाद’ अशा घोषणा देत महिला सन्मान, धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या समर्थनार्थ आवाज उठवला.

 हिजाब हा मुस्लीम महिलांची धार्मिक ओळख आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. अशा प्रकारची घटना केवळ एका महिला डॉक्टरचा अपमान नसून संपूर्ण मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणारी असल्याचे आंदोलक म्हणाले. आंदोलनादरम्यान प्रतीकात्मक निषेध करण्यात आला. संबंधित जबाबदार व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या संपूर्ण प्रकरणावर जाहिररित्या महिलांची आणि मुस्लीम समाजाची माफी मागावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 

देशात कोणत्याही महिलेच्या धार्मिक पोशाखाशी छेडछाड करणे अस्वीकार्य आहे. सार्वजनिक व्यासपीठावर एका महिला डॉक्टरसोबत असे वर्तन करणे हे महिला सन्मान, धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानिक मूल्यांच्या विरोधात आहे, असे सामाजिक कार्यकर्ते व कच्छी मशिदीचे अध्यक्ष जावेद जकरिया यांनी सांगितले.

 आंदोलनात इस्माईल, असलम फत्ता, अय्यूब, रफीक सिद्दीकी, जावेद जकरिया, शेख अझीज सिकंदर, जमील, निजाम, जावेद खान, हाजी अशरफ गाझी, रफीक जकरिया, आसिफ मनोरवाला, समीर भुरानी, अमीर भाकेई, फैजान चव्हाण, हारून भाई, इमरान चव्हाण, सिपतैन खान यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात मुस्लीम समाजामध्ये तीव्र रोषाची भावना व्यक्त होत असून माफीनामा व कारवाईची मागणी केली जात आहे.