scorecardresearch

अबब.. आता एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन, थकित रक्कम मिळावी आणि इतर मागण्या

निवृत्त कर्मचाऱ्यांनी २०१९ पासूनची येणे असलेली रक्कम मिळावी आणि इतर मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून पूर्व विदर्भात आंदोलनाची घोषणा केली आहे.

protest retired employee ST vidarbha
आता एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : एसटीच्या नियमित कर्मचाऱ्यांनी साडेपाच महिने केलेल्या संपामुळे एसटीच्या प्रवासी फेऱ्या ठप्प पडल्या होत्या. हा संप संपुष्टात आणण्यात महामंडळ अपयशी ठरले होते. आता निवृत्त कर्मचाऱ्यांनी २०१९ पासूनची येणे असलेली रक्कम मिळावी आणि इतर मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून पूर्व विदर्भात आंदोलनाची घोषणा केली आहे. महामंडळाने मागणी पूर्ण न केल्यास दुसऱ्या टप्प्यात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे.

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्रचे प्रादेशिक सचिव व महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार म्हणाले, एसटी महामंडळाकडून २०१९ मध्ये निवृत्त झालेल्या नागपूरसह इतरही भागांतील अनेक कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून येणे असलेली रक्कम अद्यापही मिळाली नाही. हे कर्मचारी वारंवार एसटीच्या कार्यालयात चकरा मारत असून त्यांना समाधानकारक उत्तरही मिळत नाही. गेली अनेक वर्षे महामंडळाला प्रामाणिकपणे सेवा दिल्यावर कर्मचाऱ्यांना या पद्धतीने मन:स्ताप देणे योग्य नाही, असे हट्टेवार म्हणाले.

हेही वाचा – बुलाढाणा : नात्याला काळिमा, काकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्यात धुक्याचे साम्राज्य; रब्बी पिकांना बसणार फटका, शेतकरी चिंतेत

तातडीने ही सगळी रक्कम व्याजासह कर्मचाऱ्यांना मिळायलाच हवी. सोबत सेवेवर असतांना दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह कुटुंबालाही सहा महिन्यांचा मोफत पास मिळावी. ती देतांना वयाची अट नसावी. निवृत्त कर्मचाऱ्यांना अल्पशी पेन्शन मिळते. त्यात या कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नाही. त्यामुळे एसटीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक योग्यता व पात्रता बघून एसटीच्या सेवेत ५ टक्के आरक्षण निश्चित करून सेवेवर घेण्याचीही मागणी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेकडून केली गेली. पहिल्या टप्यात ३० जानेवारीला पूर्व विदर्भातील सर्व एसटीच्या विभागीय कार्यालयावर आंदोलन होणार आहे. त्यानंतरही मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही अजय हट्टेवार यांनी दिला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 15:56 IST