scorecardresearch

आयपीएस अधिकारी विनीता शाहू यांना मारहाण!:घरातून पैसे, कागदपत्रांची चोरी; सात जणांवर गुन्हा दाखल

नुकत्याच दौंड येथे बदलून गेलेल्या व त्याआधी शहर पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या वरिष्ठ आयपीएस महिला अधिकारी वनीता शाहू यांना ७ जणांनी मारहाण केली.

crime
(प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : नुकत्याच दौंड येथे बदलून गेलेल्या व त्याआधी शहर पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या वरिष्ठ आयपीएस महिला अधिकारी वनीता शाहू यांना ७ जणांनी मारहाण केली. तसेच घरातील जवळपास एक लाख रुपये आणि काही महत्त्वपूर्ण कागदपत्रेही चोरी केली. याप्रकरणी विनीता शाहू यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाईन, सदर परिसरात विनीता शाहू या राहायच्या. आरोपी अभिनव बोहरे (पाचपेढी, जबलपूर-मध्यप्रदेश) या युवकाला त्या ओळखत होत्या. अभिनवही पत्नी अंकिता बोहरे, आई गीता बोहरे आणि एका मुलासह सिव्हिल लाईनमध्येच राहायचा. तो केंद्र शासनाच्या सेवेत असल्याची माहिती आहे.
गेल्या २६ एप्रिलला दुपारी अभिनवने विनीता शाहू यांच्यासोबत वाद घातला. या वादात अंकिता आणि गीता यांनीही त्याला साथ दिली. तसेच अन्य आरोपी विवेक यादव, अनुराग नामदेव, भूपेंद्र सिंग आणि एका युवकाने विनीता यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर सहाही आरोपींनी विनीता यांच्या घरातील जवळपास एक लाख रुपयांची रक्कम आणि काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे चोरी केली. विनीता यांना मारहाण झाल्याने त्यांनी सदर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्याकडे लेखी तक्रार दिली. सदर पोलिसांनी भादंविच्या कलम ३२३, ३७९, ४०६, ५०६ (२) आणि ३४ नुसार सात आरोपींवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाबाबत जाणून घेण्यासाठी तक्रारदार विनीता शाहू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
..तर सामान्य महिलांचे काय?
नागपुरात आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांनाच जर मारहाण होत असेल तर सामान्य महिलांचे काय, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याला सात जणांनी मारहाण केल्यामुळे या प्रकरणाची उपराजधानीत मोठी चर्चा आहे.
गुन्ह्याबाबत गोपनीयता
महिला पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण झाल्याने पोलीस विभाग या गुन्ह्याची माहिती देण्यास टाळाटाळ करीत होता. सदर पोलीस ठाण्यातूनही माहिती मिळत नव्हती. वरिष्ठ अधिकारीसुद्धा बोलायला तयार नव्हते.एकाही आरोपीला अटक नाही पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी गांभीर्य दाखवले नाही. या गुन्ह्यातील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. जर पोलीस अधिकाऱ्यासोबत घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना सापडत नसेल तर अन्य गुन्ह्यातील आरोपींबाबत पोलीस किती दक्ष असतील, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांना मारहाण प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.-अजय आकरे, पोलीस निरीक्षक, सदर

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ps officer vinita shahu beaten money stolen house documents stolen charges filed against seven persons amy