scorecardresearch

केवळ घर नव्हे, आयुष्याचाच ‘कोळसा’!

विष्णू शाहू यांच्या घरातील कपडे, धान्यासह अख्खे घरच आगीच्या विळक्यात सापडले.

अग्नितांडवानंतर महाकाली नगरात आक्रोश; अनेक कुटुंबांनी उघडय़ावर काढली रात्र 

नागपूर : सोमवारी सकाळी महाकाली नगरातील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत मोलमजुरी करणाऱ्या कामगारांच्या डोक्यावरील छप्परच नष्ट झाले. अनेक संसार उघडय़ावर आले.  टिना लावून तयार करण्यात आलेले घर बेचिराख झाल्यानंतर सोमवारची रात्र अनेक कुटुंबांनी उघडय़ावर काढली तर काही जळालेल्या घरासमोर बसून होते.

आग लागली त्यावेळी प्रत्येकजण आधी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होता. गॅस सििलडर फुटून आणखी आग पसरेल, ही बाब लक्षात घेऊन झोपडपट्टीला लागून असलेल्या पक्के घर असलेल्यांनी घरातील गॅस सििलडर आधी बाहेर आणून ठेवले. त्यामुळे ही घरे  सुरक्षित राहिली. झोपडपट्टीतील आग दुसऱ्या दिवशी शांत झाल्यावर वस्तीतील अनेक लोक आपल्या घरात काय राहिले आहे याचा शोध घेत होते, तर महिला घरातील काळय़ा पडलेल्या वस्तू बाजूला काढून ठेवत होत्या.

विष्णू शाहू यांच्या घरातील कपडे, धान्यासह अख्खे घरच आगीच्या विळक्यात सापडले. घराच्या कोपऱ्यात पडलेला एक ग्लास त्यांनी उचलून आणला. दुपारनंतर तर एकीकडे सूर्य आग ओकत असताना झोपडपट्टीतील लहान मुले व काही महिला आपापल्या घरातील जळालेल्या वस्तू गोळा करत होत्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता काय करायचे, ही चिंता होती. कोणी आम्हाला काही आणून देईल, या प्रतीक्षेत अनेक महिला व लहान मुले जळालेल्या घरासमोर वाट पहात होते.

रामप्रसाद पंचेश्वर यांनी दोन दिवस आधीत गहू, तांदूळ आणि अन्य जीवनावश्यक वस्तू आणून ठेवल्या होत्या. स्वयंपाकाचे सामान जळून राख झाले होते. कमल शाहू, बैजमप्रकाश भोयर, संतोष पहेल, सुधरसन पहेल, मनतराम शाहू यांची घरे जळून राख झाल्यामुळे सगळय़ाच कुटुंबातील लोक रडत होते. सोमवारी आग लागल्यानंतर परिसरात असलेल्या एका आश्रमात काही महिलांची सोय करण्यात आली होती तर काहींनी आजूबाजूला तंबू बांधून तिथे व्यवस्था केली. सोमवारी आगीची घटना घडल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते आले. त्यांनी तात्पुरती राहण्याची सोय केली. काही सामाजिक संघटनांनी सकाळी महिला व मुलांसाठी कपडे आणून दिले व अन्नधान्य दिले मात्र दोन दिवसानंतर पुढे काय हा प्रत्येक मजुरासमोर प्रश्न होता.

पुस्तके जळाली, अभ्यास कसा करणार?

अनुजराज पटेल यांच्या मुलीची परीक्षा सुरू असल्यामुळे ती सकाळी अभ्यास करत होती. दुपारी पेपरला जाणार मात्र सकाळीच आग लागल्याने ती पेपरला जाऊ शकली नाही आणि पुढे अभ्यास करण्यासाठी तिच्याजवळ पुस्तके सुद्धा राहिली नाही. ती पुस्तके आगीमध्ये जळून राख झाली.

बाळाच्या दुधासाठीही पैसे नाहीत

दररोज सकाळी दीड वर्षांच्या बाळाला दूध देणारी जनतराम शाहू यांची पत्नी म्हणाली, आमचे सगळे काही उद्ध्वस्त झाले आहे. घरात पैसे होते ते सुद्धा जळाले. दूध आणायला भांडे नाही आणि पैसेही नाहीत.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Public outrage in mahakali nagar after fire zws

ताज्या बातम्या