अजिंक्य भटकर यांचे मत; ‘लोकसत्ता’ला सदिच्छा भेट

नागपूर :  लोकसहभागाशिवाय मानव-वन्यजीव संघर्ष थांबवणे शक्य नाही आणि लोकसहभागाशिवाय शिकारींना आळा घालणेही शक्य नाही. जंगल आणि वन्यजीव संवर्धनात गावकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी वनखात्यात अनेक चांगल्या योजना आहेत. मात्र, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात कु ठेतरी गफलत होत आहे. मानद वन्यजीव रक्षक म्हणून ही आमचीही जबाबदारी आहे आणि आम्ही ती निश्चितच चांगल्या पद्धतीने पार पाडू, असा विश्वास मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे व मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी वन्यजीव, पक्ष्यांची शिकार या विषयांवर संवाद साधला. अजिंक्य भटकर म्हणाले, राज्याच्या वनखात्यात सध्या वाघ आणि इतर वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांच्या अटके चे सत्र सुरू आहे.वनखात्यातील अधिकारी चांगली कामगिरी करत आहेत,

पण या शिकारी घडून गेल्या आहेत. त्या रोखण्यासाठी शिकारीमागील कारणे शोधून काढावी लागतील. २०१३ ते २०१५ दरम्यान, जे शिकारीचे सत्र उघडकीस आले, त्यात बहेलिया शिकाऱ्यांचा हात होता. आता जे शिकारीचे सत्र उघडकीस येत आहे, त्यात मोठय़ा प्रमाणात अंधश्रद्धा कारणीभूत आहे. ही अंधश्रद्धा कनिष्ठ स्तरावरच नाही तर मध्यम आणि उच्चवर्गीयांमध्येही आहे. त्यामुळे शिकारीला प्रोत्साहन मिळत असून, ही बाब चिंताजनक आहे. शिकारी शिकार करतात ते चूकच आहे, पण शिकारीला प्रोत्साहन देणारे शिकाऱ्यांपेक्षाही अधिक दोषी आहेत.

अविनाश लोंढे म्हणाले, जंगल आणि वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी ही कुणा एकाची  नाही. वनखात्यासोबतच ही आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांची देखील आहे. यासंदर्भातील कायदे अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. ते लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील, त्याबाबत कशी जनजागृती करता येईल, यासंदर्भातला प्रस्ताव अलीकडेच प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडे दिला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच सध्या वनखाते आहे. राज्य वन्यजीव मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे, जंगल आणि वन्यजीवांबाबत त्यांना आस्था आहे आणि म्हणूनच त्यांच्या संवर्धनासाठी अनेक चांगले निर्णय ते घेत आहेत.

शिकारी, संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने आता लोकांना जुळवून घेणे आवश्यक झाले आहे. लोकांची मानसिकता हळूहळू बदलत आहे. वाघाचे अस्तित्व ते स्वीकारत आहेत. मात्र, त्यांना केवळ व्याघ्रमित्र बनवून, गणवेश देऊन भागणार नाही तर त्यांच्यासाठी इतरही सुविधा खात्याला द्याव्या लागतील. वाघ, बिबटय़ाच्या हल्ल्यात जनावरे, माणसे मृत्युमुखी पडल्यानंतर खात्याकडून दिल्या जाणाऱ्या मोबदल्याची प्रक्रि या सोपी करावी लागेल.

वाघ आणि इतरही वन्यजीवांच्या शिकारी संरक्षित क्षेत्राबाहेर अधिक आहेत. त्यामुळे  या घटना रोखण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी निधीची तरतूद आवश्यक आहे. त्यासाठी प्रादेशिक विभागाकडे येणारा

निधी  वळता करता येईल. राज्य वन्यजीव मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संरक्षित क्षेत्राव्यतिरिक्त इतरही क्षेत्रातील वन्यजीवांच्या संवर्धनासाठी राज्य वन्यजीव कृ ती आराखडा मंजूर करण्यात आला. त्याचाही फायदा निश्चितच होणार आहे, असे अविनाश लोंढे व अजिंक्य भटकर पाटील यांनी सांगितले.

स्थलांतरित पक्ष्यांची शिकार गंभीर बाब

शिकारीचा प्रश्न फक्त वन्यजीवांचाच नाही. पक्ष्यांच्या आणि त्यातही प्रामुख्याने स्थलांतरित पक्ष्यांच्या शिकारी मोठय़ा प्रमाणात होतात. बरेचदा तलावावर मासेमारी करणारे या शिकारीत सहभागी असतात. स्थलांतरित पक्ष्यांच्या शिकारी या मांस खाण्यासाठी तर घुबडाची शिकार ही अंधश्रद्धेसाठी के ली जाते. गेल्या काही वर्षांत पक्षी निरीक्षकांमुळे या शिकारीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला असला तरी त्या पूर्णपणे रोखता आलेल्या नाहीत, अशी खंतही दोन्ही मानद वन्यजीव रक्षकांनी व्यक्त के ली.

करोनामुळेही शिकारीत वाढ

करोनाकाळात इतर वन्यजीवांसह वाघांच्या शिकारीत मोठय़ा प्रमाणात वाढ दिसून आली. करोनाने अनेकांची आर्थिक गणिते विस्कटली. त्यामुळे  ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी शिकारीचा  एक मार्ग अवलंबला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिकार करणाऱ्या आणि करवून घेणाऱ्या प्रत्येकाला वाटते की आपण यातून सहज सुटू. मात्र, वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सध्या शिकाऱ्यांची जी धरपकड सुरू के ली आहे, त्यातून शिकारी खात्याच्या हातून सुटू शकत नाहीत, हे नक्की असेही लोंढे व भटकर पाटील म्हणाले.