वर्धा : श्रेयासाठी चाललेली धडपड राजकारणात नवी नाही. “हे काम माझेच” असा दावा जेव्हा दोन परस्परविरोधी लोकप्रतिनिधी करतात, तेव्हा जनता पेचात पडते. वर्धा जिल्ह्यात सध्या असाच काहीसा प्रकार घडत आहे. आर्वी बाजारपेठेसाठी महत्त्वाच्या असलेल्या पुलगाव – आर्वी – वरुड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे आता ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणार असून, त्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने निधीची तरतूद केली आहे. मात्र, हे काम नक्की कोणामुळे मार्गी लागले, यावरून आता वादाला तोंड फुटले आहे.

खासदार अमर काळे यांचा दावा

हा मार्ग आता छोटा (नॅरोगेज) राहणार नसून तो मोठा (ब्रॉडगेज) होणार आहे. हे काम आपणच मार्गी लावल्याचा दावा खासदार अमर काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. १९१७ ते २००५ पर्यंत या मार्गावर वाहतूक सुरू होती, मात्र ती बंद झाल्याने परिसरातील नागरिक अडचणीत आले होते. काळे यांनी नमूद केले की, त्यांनी २०२५ च्या मार्चमधील संसद अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर सतत पत्रव्यवहार करून आणि रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. पुढे मार्च २०२६ च्या अधिवेशनातही त्यांनी हा विषय मांडला.

सुरक्षेचा मुद्दा

खासदार काळे यांच्या मते, १९७१ च्या युद्धकाळात पुलगाव दारूगोळा भांडार (Military Depot) शत्रूच्या टप्प्यात असल्याने तेथील साहित्य आमला भांडारात हलवण्याच्या सूचना होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने पुलगाव-नागपूर-आमला हा मार्ग योग्य नाही; त्याऐवजी पुलगाव-वरुड-आर्वी-आमला हा मार्ग अधिक सुरक्षित ठरतो. ही बाब काळे यांनी संसदेत मांडली आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली. रेल्वे व संरक्षण या दोन्ही मंत्रालयांनी याची दखल घेत या मार्गाला मंजुरी दिली असून, त्यासाठी २ कोटी ४९ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची गरज नसून, खासदारांचे हे यश एक ‘मैलाचा दगड’ ठरेल, असा दावा त्यांच्या कार्यालयाने केला आहे.

आमदार सुमित वानखेडे यांची टीका

खासदार काळे यांनी या कामाचे श्रेय घेताच आमदार सुमित वानखेडे यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. “आधीच मंजूर झालेल्या निधीचे श्रेय घेण्याचा खासदारांचा प्रयत्न केविलवाणा आहे,” असा टोला आमदार वानखेडे यांच्या कार्यालयाने लगावला आहे. रेल्वे मंत्रालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजीच या कामासाठी निधी मंजूर केला होता; मग २०२६ मध्ये प्रश्न मांडणारे काळे ही खोटी धडपड का करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमदार वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२४ मध्ये तळेगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी या रेल्वे मार्गासाठी निधी देण्याची घोषणा केली होती.

प्रशासकीय हालचाली

पंतप्रधानांच्या घोषणेनंतर प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली झाल्या आणि ऑगस्ट २०२४ मध्ये पहिल्या लाईनच्या सर्वेक्षणाचे टेंडरही काढण्यात आले. ज्या कामाची तांत्रिक प्रक्रिया दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न खासदारांनी थांबवावा, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.

“फुकाचे श्रेय घेऊ नका” – आमदार वानखेडे

या प्रकल्पासाठी २०२५-२६ च्या सत्रात पंतप्रधान मोदींनी आश्वासनाची पूर्तता म्हणून २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. विशेष म्हणजे, या वर्षीच्या अर्थसंकल्पात उर्वरित कामासाठी पुन्हा तेवढ्याच निधीची तरतूद करण्यात आली आहे. “केंद्र व राज्य शासन जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास बांधील आहे, फुकाचे श्रेय घेण्यासाठी नाही,” असे वानखेडे म्हणाले.

आमदार वानखेडे यांनी यासंदर्भातील उपलब्ध कागदपत्रे तपासण्याचे आव्हान दिले असून, खासदार काळे यांचा दावा फोल असल्याचे स्पष्ट केले आहे. “आधीच मंजूर काम आणि प्राप्त निधीचे आयते श्रेय लाटणे म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत’ आणण्यासारखे आहे. जनता अशी दिशाभूल खपवून घेणार नाही,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.