नागपूर : पुणे-अजनी वातानुकूलित एक्स्प्रेसच्या वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे. गाडी तब्बल पाच ते आठ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मध्य रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले

पुणे ते अजनी दरम्यान धावणारी गाडी क्रमांक २२१२३ (पुणे-अजनी एसी एक्सप्रेस) अलीकडेच सुमारे पाच तास उशिराने नागपूरला पोहोचली. त्यानंतर नागपूरहून पुण्याकडे रवाना होताना हीच गाडी तब्बल आठ तास उशिराने धावत असल्याचे समोर आले. परिणामी, नियोजित वेळेनुसार प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले. सकाळच्या सत्रात कार्यालयीन कामे, शासकीय बैठका, वैद्यकीय उपचार तसेच इतर वैयक्तिक कामांसाठी नागपूरला पोहोचणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला.

कोचमध्ये अटेंडंटच अनुपस्थित

वातानुकूलित डब्यांमधील सुविधा पुरविण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची उपलब्धता अत्यल्प होती. कोच बी-३ मध्ये अटेंडंटच नसल्याने प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. बेडरोल, स्वच्छता तसेच इतर सेवांबाबत विचारणा करण्यासाठी जबाबदार कर्मचारी उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तक्रार नोंदविण्यासाठीही प्रवाशांना वारंवार प्रयत्न करावे लागल्याचे सांगण्यात आले.

पाणीटंचाईमुळे प्रवाशांची गैरसोय

गाडी दीर्घकाळ उशिराने धावत असल्याने शौचालयांतील पाण्याचा साठा संपला होता. पिण्याच्या पाण्याचीही कमतरता जाणवत होती. विलंब लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक तास प्रवास करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

खानपान सेवांवरही प्रश्नचिन्ह

गाडीतील साईड पँट्री सेवा समाधानकारक नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. वेळेवर अन्नपदार्थ उपलब्ध न झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. गाडीच्या वाढलेल्या प्रवासकाळात अतिरिक्त खाद्यपदार्थ किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याचेही प्रवाशांनी सांगितले. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक फटका बसल्याचे नमूद करण्यात आले.

‘एक्सप्रेस’ की ‘पॅसेंजर’?

वारंवार होणारा विलंब आणि अनेक स्थानकांवरील थांबे यामुळे प्रवाशांनी या गाडीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘एसी एक्सप्रेस’ म्हणून अतिरिक्त भाडे आकारले जात असताना सेवा मात्र पॅसेंजर गाडीप्रमाणे मिळत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीचे सदस्य नितीन सोळंके यांनी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे तक्रार नोंदवून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.