नागपूर : मुंबई, नागपूरातल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात लिपीकाची नोकरी लावून देतो असे, आमिष दाखवत भामट्यांच्या टोळीने दोन जणांना २७ लाख ५० हजार रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी चव्हाट्यावर आला. या टोळीतला सुत्रधार हा विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला लागून असलेल्या वाघोली येथील रहिवासी आहे. त्याने राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर पासून अवघ्या काही किलोमिटर अंतरावरील कोराडीतल्या दोन जणांची फसवणूक केली.
या प्रकरणी कोराडी पोलिसांनी तीन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र साहेबराव तायडे (रा. वाघोली, पुणे), रविराजकुमार सिंग आणि ‘कुमार’ (दोघेरी रा. नागपूर) अशी या तिन ठगबाज भामट्यांची नावे आहेत.
कोराडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप कमलाकांत खसारे (४१) यांची नातेवाईक रविंद्र कावलकर यांच्याशी ओळख होती. मुंबईच्या जीटी रुग्णाणलयात लिपीकाची नोकरी लावून देण्यासाठी कावलकर यांनी आपणही ६ लाख रुपये पुण्यातील एकाला दिले असल्याचे सांगितले. दरम्यान, प्रदीप यांनीही आपल्या पत्नीसाठी नागपुरात लिपीकाची नोकरी असल्यास कळवा असे कावलकरला सांगितले.
टोळीने असा केला कारनामा….
त्यावरून रविंद्र कावलकरने मित्र पुण्यातल्या वाघोली येथील रहिवासी देवेंद्र साहेबराव तायडे याच्याशी संपर्क साधला. देवेंद्र तायडे याने नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात लिपीकाची नोकरी लावून देऊ शकतो, असे सांगत २५ लाख रुपयांची मागणी केली. अखेर २३ लाख रुपयांमध्ये व्यवहार ठरला. ठगबाज तायडे याने ३ ऑगस्ट २०२४ ते १८ जून २०२५ या कालावधीत साथीदार रविराजकुमार सिंग (रा. बेसा, नागपूर) आणि ‘कुमार’ नावाच्या तिसऱ्या व्यक्तीमार्फत प्रदीप खसारे यांच्याकडून त्यांच्या पत्नीची वैयक्तित माहिती संबंधी मूळ कागदपत्रे आणि २३ लाख रुपये रोख स्वीकारले.
नोकरीही नाही आणि मिळकतही गमावली…
नोकरीवर रुजू करून घेण्यास सातत्याने उशीर झाल्याने प्रदीप यांनी विचारणा केली. त्यावर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. पैसे परत मागितले असता तेही देण्यास नकार दिला. ठगबाजांनी रविंद्र कावलकर यांच्याकडूनही १४ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांच्या पत्नीलाही नोकरी लावून दिली नाही व रक्कम परत केली नाही. ठगबाजांनी प्रदीप खसारे व त्यांचे नातेवाईक कावलकर यांचा विश्वास संपादन केला आणि दोन्ही कुटुंबांची मिळून एकूण २७ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. खसारे यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला.
