नागपूर : गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे पुणे-नागपूर इंडिगोचे विमान नागपूर विमानतळावर उतरू शकले नाही. काही काळ नागपूरच्या हवाई हद्दीत घिरट्या घातल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान हैदराबादकडे वळविण्यात आले.
खराब हवामानाचा हवाई वाहतुकीवर परिणाम
शहरात गुरुवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात घटल्याने नागपूर विमानतळावरील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. पुणे-नागपूर इंडिगोचे ६ई-२४८१ हे विमान नियोजित वेळेनुसार नागपुरात दाखल झाले असले, तरी प्रतिकूल हवामानामुळे ते धावपट्टीवर उतरविणे शक्य झाले नाही. हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने (एटीसी) विमानाला तत्काळ लँडिंगची परवानगी दिली नाही.
होल्डिंग पॅटर्नमध्ये घिरट्या
विमानाने दुपारी १.४० वाजता पुण्याहून उड्डाण केले होते. ते दुपारी ३.१० वाजता नागपुरात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, विमान नागपूरच्या हवाई हद्दीत आल्यानंतर वैमानिकाला ‘होल्डिंग पॅटर्न’मध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार विमानाने काही काळ आकाशात घिरट्या घालत परिस्थिती सामान्य होण्याची प्रतीक्षा केली. मात्र, हवामानात अपेक्षित सुधारणा न झाल्याने पर्यायी निर्णय घेण्याची वेळ आली.
विमान हैदराबादला वळविले
दृश्यमानतेत सुधारणा होत नसल्याने आणि सुरक्षित लँडिंग शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वैमानिकाने विमान हैदराबादकडे वळविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत घेण्यात आला. हैदराबाद विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरले. त्यानंतर हवामानाचा आढावा घेऊन परिस्थिती अनुकूल झाल्यावर विमानाने पुन्हा नागपूरकडे उड्डाण केले.
सायंकाळी सुरक्षित लँडिंग
हैदराबादहून सायंकाळी ४.२५ वाजता पुन्हा उड्डाण केलेले विमान सायंकाळी ४.५८ वाजता नागपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. या संपूर्ण घडामोडीदरम्यान काही काळ प्रवाशांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, विमान सुरक्षितपणे नागपुरात पोहोचल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, खराब हवामानामुळे विमानाला वळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. संबंधित विमान कंपनीकडूनही ही कारवाई सुरक्षित उड्डाण नियमांनुसार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रतिकूल हवामानाचा फटका हवाई वाहतुकीला बसल्याने काही अन्य विमानांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
